सत्ताधारी नगरसेवकांनीच स्वखर्चाने बुजविले खड्डे

भाजपा सत्ताधारी नगरसेवकांत गटबाजीचे दर्शन!

पाथर्डी – शहरातील रहदारीच्या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी काही सत्ताधारी नगरसेवकांनी तोंडी व लेखी स्वरुपात पालिका प्रशासनाकडे केली होती. वेळोवेळी सांगूनही त्याची दखल न घेतली गेल्याने आज अखेर या नगरसेवकांनी एकत्रित येऊन पदर खर्चाने शहरातील खड्डे बुजवले. सत्ताधारी नगरसेवकांनी केलेल्या कार्याचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे यावरून जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

शहरातील जुन्या बसस्थानकाच्या दोन्ही गेटवर मोठमोठे खड्डे पडल्याने छोटी वाहने त्यात फसत होती. एसटी बसचीही तिच तऱ्हा होती. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन वाहनचालक जखमी झालेले आहेत. पालिका पदाधिकाऱ्यांनाही या खड्ड्यांचा दणका बसूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. प्रभाग चारमध्ये ही रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते.

नागरिकांनी यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे व नगरसेवकांकडे वेळोवेळी तक्रार करून खड्डे बुजविण्याची मागणी केली. पालिकेतील सत्ताधारी नगरसेवक प्रवीण राजगुरू, प्रसाद आव्हाड, संतोष गटाणी, नगरसेविका दीपाली बंग, प्रशांत शेळके यांनी शहरातील खड्डे बुजविण्याची लेखी व तोंडी मागणी पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या नगरसेवकांनी आज एकत्रित येऊन स्वखर्चाने जुन्या बस स्थानकातील, प्रभाग क्र.4 सह शहरातील विविध ठिकाणी खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली.

यावेळी नगरसेविका संगीता गटाणी म्हणाल्या, शहरातील जुने बसस्थानक येथे नगर रोड व शेवगाव रोड कडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे नेहमी या ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत होते. याची दखल पालिका घेत नसल्याने आज हा उपक्रम शहरातील आम्ही नगरसेवकांनी राबवला.

यासह नवीन चेंबर बनवणे, जुने दुरुस्त करणे, पेव्हिंग ब्लॉग दुरुस्ती, नवीन एलईडी बसवणे व जुने दिवे दुरुस्त करणे, यासह स्वच्छते संदर्भातील कामे नगरसेवकांनी सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नगरसेवकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केला. पालिका कारभारावर अंकुश नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे याबाबत येत्या सर्व साधारण सभेमध्ये संबंधितांना जाब विचारणार आहोत.

दरम्यान पालिका सभागृहातील विरोधी गट शांत असून, सत्ताधारी नगरसेवकांनीच पालिका कारभारावर नाराजी व्यक्त केल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे . नगरसेवकांनी स्वखर्चातून खड्डे बुजवण्याच्या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असली, तरी या सर्व घडामोडीत भाजपा सत्ताधारी गटात मोठमोठे राजकीय खड्डे पडले असल्याचे स्पष्ट दिसते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)