वॉटरकप स्पर्धेसाठी ‘पाथर्डी’ तालुक्‍याची दुसऱ्यांदा निवड

पाथर्डी – वॉटरकप स्पर्धेसाठी पुन्हा एकदा पाथर्डी तालुक्‍याची निवड झाली असल्याने या स्पर्धेत तालुक्‍यातील सर्व गावांनी सहभागी होऊन कायमचा दुष्काळी तालुका हा शिक्का पुसवण्यासाठी सर्वानी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी केले.

सिनेअभिनेता आमिर खान संस्थापक असलेल्या पाणी फौंडेशनने आयोजित केलेल्या वॉटरकप स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा तालुक्‍याची निवड झाली असून या संदर्भात पंचायत समितीमधील स्व. गोपीनाथ मुंडे सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, आबासाहेब लाड, बाळासाहेब शिंदे, विक्रम पाठक, विश्‍वजीत गुगळे, अजित देव्हडे, धनश्री शिरसाठ,अनिल ढाकणे, कल्पजीत डोईफोडे तसेच ग्रामसेवक व कृषी सहायक उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवदत्त केकाण म्हणाले, या स्पर्धेमुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याची मोठी संधी मिळाली आहे. ग्रामसेवक व तलाठी यांनी ग्रामस्थांच्या मनसंधारणेचे काम केले तर प्रत्येक गावात जलसंधारणेचे मोठे काम पूर्ण होईल. या स्पर्धेत लोकसहभाग महत्वाचा असल्याने प्रत्येकानेच श्रम करून आपला सहभाग नोंदवावा. त्यासाठी जनजागृतीसुद्धा महत्वाची असल्याने प्रत्येक शासकीय कर्मचारी,अधिकारी व लोकप्रतिनिधींनी जनजागृती करायला हवी.

जलसंधारणेची कामे केली तरच आपली शेती समृद्ध होऊन आपले गावसुद्धा समृद्ध होणार आहे. गाव पाणीदार करताना गावकऱ्यांच्या मनाची मशागत सुद्धा करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा तयार करून त्यामधे प्रत्येक गावात जी कामे करायची आहे, त्याचा आराखडा तयार करण्याचे आदेशही या वेळी केकाण यांनी दिले.प्रास्ताविक रोहिदास आघाव यांनी केले. तर आभार शाहूल आल्हाट यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)