जलपूजनावरून राजळे-घुले समर्थकांत बाचाबाची

चंद्रशेखर घुले यांच्या उपस्थितीत पाडळी येथे घडला प्रकार : कामांचे श्रेय घेण्यावरून दोन गट आमनेसामने 

पाथर्डी – आमदार मोनिका राजळे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या समर्थकांमध्ये जलपूजनाच्या कार्यक्रमावरून चांगलीच शाब्दिक झाली. घुले यांच्या उपस्थितीत तालुक्‍यातील पाडळी येथे हा प्रकार घडला. तालुक्‍यातील पाडळी परिसरातील पाटाला सध्या पाणी सुटले असून परिसरातील तलाव पाण्याने भरला आहे. घुले आमदार असताना त्यांनी पाटाचे पाणी तलावात सोडण्यासाठी दोन विद्युत पंप व पाईपलाईनचे साहित्य दिले होते.

सध्या पाटाचे पाणी तलावात सोडण्यात आले असून या तलावातील पाण्याचे पूजन करण्यासाठी घुले यांना पाडळी येथील समर्थक सुरेश कचरे, बबन बांगर, राजू गर्जे, भारत कचरे, देविदास काळे, उद्धव गर्जे यांनी बोलावले होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे घुले आज पाडळी येथे पाणी पूजनासाठी आले होते.त्यांच्या समवेत जि.प.चे माजी सदस्य शिवशंकर राजळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, नगरसेवक बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे, अमोल वाघ, बाबासाहेब चितळे, बन्सीभाऊ सातपुते, बंडू अकोलकर हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची कुणकुण आ.राजळे समर्थकांना लागली. आ.राजळे यांच्या प्रयत्नांमुळे पाटाला पाणी सुटले व तुमचा संबंध नसतानाही तुम्ही जलपूजन कसे करता असा आक्षेप घेत जल पूजनाला विरोध केला. यावेळी राजळे यांचे समर्थक व पाडळीचे सरपंच बाजीराव गर्जे, शेषराव कचरे, गणेश कचरे आदी आले व तलावात पाणी आम्ही सोडले व जलपूजन मात्र तुम्ही करत आहेत. या कामाशी तुमचा काय संबंध अशी विचारणा करत कार्यक्रम घेण्यास विरोध केला.

यावेळी घुले व राजळे समर्थकांमध्ये चांगली शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी शेषराव कचरे, बाजीराव गर्जे यांनी आ. राजळे यांच्या प्रयत्नामुळे पाटाला पाणी आले आहे, या तलावात आम्ही पाणी सोडले असून आम्हाला निमंत्रण न देता तुम्ही परस्पर कसा कार्यक्रम घेता असे म्हणत घुले यांच्या कार्यकर्त्यांना विरोध केला तर घुले समर्थक असलेले सीताराम बोरुडे यांनी लोकशाहीमध्ये कार्यक्रम घेण्याचे स्वांतत्र्य सर्वांना आहे. आमचा कार्यक्रम झाला की तुम्ही सुद्धा कार्यक्रम घेऊ शकता असा प्रतिवाद केला. त्यानंतर घुले यांनी हा कार्यक्रम आपले समर्थक राजू गर्जे यांच्या घरी घेतला.

यावेळी बोलताना चंद्रशेखर घुले यांनी सध्या दुष्काळी परिस्थिती असून पाणी टंचाईला तोंड देताना कोणी राजकरण करत असेल तर ते चुकीचे आहे. दोन्ही कॉंग्रेसच्या काळात दुष्काळात जनावरांच्या चारा छावण्या आम्ही सुरु करत शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधींना दुष्काळी परिस्थिती हाताळणे जमत नसल्याने अपयश झाकण्यासाठी ते आजच्या सारखे उद्योग करत आहेत. आज जे येथे घडले ते आम्हाला शेवगाव तालुक्‍यात सुद्धा करता येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

तर यावेळी बोलताना बाळासाहेब ताठे म्हणाले, घुले आमदार असताना पाडळी गावात विजेचे सबस्टेशन उभारण्यास मंजुरी मिळाली होती, मात्र जागा उपलब्ध न झाल्याने हे सबस्टेशन कासार पिंपळगाव येथे सुरु करण्यात आले. घुले यांच्या मुळेच या ठिकाणी आज वीज मिळत आहे. या गावात दहशत निर्माण करणाऱ्यांना वेळ आल्यावर जनता जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. पुढील वेळेस घुले यांना आमदार करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)