वडगावला वीजवाहक तारा तुटून ’30 एकर’ ऊस खाक

पाथर्डी  – वीजवाहक तारा तुटून लागलेल्या आगीत बारा शेतकऱ्यांचा तीस एकरवरील ऊस जळून खाक झाला. यावेळी आग विझविण्यास पाणीही नसल्याने शेतकरी हतबल झाले होते. ही घटना तालुक्‍यातील वडगाव येथे आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. मात्र रात्री उशिरापर्यंत या घटनेची साधी पाहणीही अधिकाऱ्यांकडून करण्यात आली नाही.

याबाबत आधिक माहिती अशी की, पाथर्डीपासून 30 कि. मी. अंतरावर असलेल्या वडगाव येथे आज सकाळी दहाच्या सुमारास वीजवाहक तारा तुटून उसावर पडल्या. त्यातून निघालेल्या ठिणग्यांतून उसाने पेट घेतला. जळालेला सर्व ऊस हा तोडणीसाठी आला होता. या आगीत एकनाथ बडे, अमीन शेख, बाबूलाल शेख, महंमद शेख, आश्रूबाई पांगरे, बबन पांगरे, भास्कर पांगरे, घनश्‍याम पांगरे, भाऊसाहेब पांगरे, रावसाहेब पांगरे, अश्रू पांगरे, विष्णू पांगरे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे ऊस पीक जळून खाक झाले.

-Ads-

उसाला आग लागल्याचे लक्षात येताच वडगाव येथील तरुण घटनास्थळी जमा झाले. मात्र आग विझविण्यास पाणीही नसल्याने त्यांनी जमेल तेवढा ऊस तोडून वाचवला. त्यासाठी सरपंच आजिनाथ बडे, शाहदेव पांगरे, दत्तात्रय गरड, युवराज पांगरे, आजिनाथ पांगरे, गणेश बडे यांच्यासह तरुणांनी पुढाकार घेतला.

हा ऊस तोडत असताना शाहदेव पांगरे यांच्या कमरेला असलेल्या टॉवेलने पेट घेतला. मात्र सुदैवाने त्यांना त्याची झळ बसली नाही. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी प्रशासन व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. मात्र सायंकाळपर्यंत कोणीही घटनास्थळी फिरकला नाही.

वीजवाहक तारा जीर्ण झाल्याने एक महिन्यापूर्वीही एका शेतकऱ्याचा एक एकर ऊस जळून खाक झाला होता. तातडीने वीजवाहक तारा बदलाव्यात, तसेच जळालेला ऊस वृद्धेश्वर कारखान्याने घेऊन जावा, अशी मागणी आजिनाथ बडे यांनी केली आहे. या संदर्भात शहादेव पांगरे यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)