पाथर्डी तहसीलवर डफडे मोर्चा

अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांसह ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

पाथर्डी – तालुक्‍यातील शिरसाठवाडी येथील पाझर तलावातून अनधिकृत पाणी उपसा करण्याच्या प्रकरणाला जबाबदार धरून ग्रामसेवक व पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी शनिवारी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर डफडे मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व राजेंद्र शिरसाठ यांनी केले. संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रभारी तहसीलदार पंकज नेवसे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, शिरसाठवाडी येथील तलावातून गेल्या अनेक दिवसांपासून तलावालगत असलेल्या शेतकऱ्यांनी अनधिकृत विद्युतपंप टाकून पाणी उपसा सुरू केला असल्याचा, आरोप तेथील ग्रामस्थांनी करत हा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर तसेच ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी महसूल प्रशासनाकडे केली होती.

कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शिरसाठवाडी येथील राजेंद्र शिरसाठ, पोपट पालवे, आजिनाथ शिरसाठ, शिवाजी महाजन, नारायण शेकडे, दीपक शिरसाठ, सुनील शिरसाठ, आसाराम शिरसाठ आदी कार्यकर्त्यांनी डफडे वाजवत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी राजेंद्र शिरसाठ म्हणाले, तलावालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी तलावात वीजपंप टाकून तसेच तलावाच्या शेजारी विहीर खोदून अमर्याद पाणी उपसा केल्याने तलावातील पाणीसाठा संपून गेला आहे. सध्या शिरसाठवाडीला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाला या प्रकरणाची वेळीच माहिती दिली होती, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

या ठिकाणी असलेल्या ग्रामसेवक यांना राजकीय आशीर्वाद असल्याने ते कोणतीही कारवाई करत नाही. या ग्रामसेवकाची बदली होऊन सहा महिने झाले असले तरीही ती पदभार सोडत नाहीत. तलावाची मोजणी फी भरलेली आहे मात्र मोजणी केली जात नाही. तातडीने कारवाई करावी अन्यथा मोर्चा विसर्जित करणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यानंतर प्रभारी तहसीलदार पंकज नेवसे यांनी 15 दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)