पालकमंत्री शिंदे व आ. कर्डीले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन

वांबोरी चारीच्या पाण्यासाठी सातवडमध्ये तिसऱ्या दिवशीही आंदोलन

पाथर्डी – वांबोरी चारीचे पाणी पुर्ण दाबाने व नियमित मिळत नसल्याने सातवड (ता.पाथर्डी) येथील शेतकऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करीत शुक्रवारी पालकमंत्री राम शिंदे व आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. वांबोरी चारीच्या पाण्यासाठी सातवड ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी कराळे यांच्यासह माजी सभापती संभाजी पालवे, युवक कॉंग्रेसचे प्रकाश शेलार, स्वाभिमानीचे शरद मरकड यांनी सातवड येथे येवून या आंदोलनाला पाठींबा दिला.

यावेळी कराळे म्हणाले, दुष्काळी परिस्थिती असतांना देखील वांबोरी चारीचे पाणी पाथर्डीसारख्या दुष्काळी भागाला मिळत नाही, या पाण्यासाठी स्थापन करण्यात आलेली स्वयंघोषीत कृती समिती आता कुठे गेली? आमचे पदाधिकारी म्हणून पुतळे जाळता मग कृती समितीने पुकारलेले आंदोलन कोणामुळे रद्द झाले याचाही विचार करण्याची गरज आहे. कोणीच पुढे येईना म्हणून सातवड ग्रामस्थांना आंदोलनासाठी पुढे यावे लागले. काल आंदोलकांनी कराळे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्यानंतर कराळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

वांबोरी चारीचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे यासाठी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, रामभाऊ मामा अकोलकर, जनार्धन गवळी, नामदेव आव्हाड, धोंडीभाऊ मुखेकर गुरूजी, बाबूजी आव्हाड, चंद्रकांत म्हस्के यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळे शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या योजनेला निधी दिला.

आता कोणीही या वांबोरी चारीच्या नावाखाली दुकानदारी करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक लाभधारक गावाला पाणी मिळाले पाहीजे ज्यांच्या तलावात पाणी आले ते शांत आहेत. या आंदोलनाला शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांचा पाठींबा असल्याचे कराळे म्हणाले.

उपसरपंच राजेंद्र पाठक म्हणाले, आम्ही निवेदे देतोय, पुतळे जाळतोय तरी देखील इकडे कोणीच प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन फिरकत नाही. आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका आम्हालाही अनेक मोठयांचे आशीर्वाद आहेत.

आम्ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, खा.सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात आहोत. नुसते येतो म्हणणारे अधिकारी प्रत्यक्षात मात्र आमच्या भावना समजून घ्यायला देखील येईनात. आम्हाला आंदोलनाची हौस नाही, अशा शब्दात पाठक यांनी आंदोलकांच्या वतीने बाजू मांडत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी पालवे, शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उध्दवराव पाठक, विनायक पाठक, संतोष पाठक, युवा नेते भैय्या पाठक, दिलीप पाठक,संभाजी सरोदे, नितीन वाघ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)