अनधिकृत पाणीउपश्‍यावर कारवाईची मागणी

शिरसाठवाडीतील ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे दिला आंदोलनाचा इशारा

पाथर्डी- तालुक्‍यातील शिरसाठवाडी पाझर तलावात अनधिकृत पाणी उपसा झाल्याने परिसरातील गावावर तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.तसेच तलाव परिसरात काही राजकीय मंडळींनी अतिक्रमण केलेले आहे. अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या व अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा दि. 17 नोव्हेंबर रोजी पाथर्डी तहसील कार्यालयात डफडे बजाओ आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिरसाठ यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी शहरालगत असणाऱ्या शिरसाठवाडी या पाझर तलावात अनधिकृत पाणी उपसा झाल्याने परिसरातील गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. टंचाई काळात पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी या तलावातील पाणी आरक्षित केलेले होते.

काही राजकीय मंडळींनी व अधिकाऱ्यांनी संगनमत करून करून अनधिकृत पाणी उपसा केलेला आहे. तसेच पाझर तलावाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. अनधिकृत पाणी उपसा थांबवावा व अतिक्रमण हटवावे यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून ग्रामस्थ प्रशासनाकडे तक्रारी करून पाठपुरावा करत आहेत. जिल्हा परिषदेने दोन वर्षांपूर्वी मोजणी फी भरली आहे. मात्र दबावामुळे प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

पाथर्डी तालुक्‍यात यावर्षी भीषण दुष्काळ परिस्थिती असून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनधिकृत पाणी उपशामुळे शिरसाठवाडी तलावातील पाणी संपुष्टात आले असून तलावा शेजारील रांजणी, केळवंडी, हंडाळवाडी, मोहरी अशा गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

अतिक्रमण करणाऱ्या व अनधिकृत पाणी उपसा करुन पाणीटंचाई निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तहसील कार्यालयात डफडे बजाओ आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. राजेंद्र शिरसाठ, भीमराव शिरसाठ, आदिनाथ शिरसाठ, पोपट पालवे, शहाराम फुंदे आदी ग्रामस्थाच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसिलदार रमेश ससाणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड यांना निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)