दुष्काळापुढे संपाची आरोळी ठरली फोल

File Photo

ऊसतोडणी कामगारांनी धरली बेलापूरची वाट

-बाबासाहेब गर्जे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाथर्डी  – विविध मागण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोडणी कामगारांनी संपाची हाक दिली खरी पण दुष्काळाची भयावह स्थिती पाहून संपापेक्षाही रोजीरोटी महत्वाची. आज काम केले नाही तर पुढे दुष्काळाच्या परिस्थितीत पैस आणायचा कोठून हे लक्षात आल्याने संपाची आरोळी धुडकावून ऊसतोडणी कामगारांनी दिवाळीपूर्वीच बेलापूरची (साखर कारखान्यांची) वाट धरली आहे.

पाथर्डी तालुका कायम दुष्काळी. जिरायती शेती व्यतिरिक्‍त उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने तालुक्‍यात सुमारे 60 हजार ऊसतोडणी कामगार दरवर्षी सहा महिन्यांसाठी स्थलांतरित होतात. तालुक्‍याची सामाजिक व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन राजकीय पक्षांकडून याचा पुरेपुर लाभ उठवला जातो. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व करीत आहेत.

ऊसतोडणी कामगारांचे मेळावे, त्यामधून व्यक्‍त होणाऱ्या त्यांच्या मागण्या, त्यातून उपसले जाणारे संपाचे हत्यार, अशा विविध पैलूंवर राज्याचे राजकारण ऊसतोडणी कामगाराभोवती फिरते. कामगारांसाठी या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. बहुतांशी कामगार तर या विषयाकडे सामाजिक एकोपा व नेतृत्वावरील निष्ठा म्हणून पाहतात.

गेली अनेक वर्षांपासून भगवानगडावरील दसरा मेळाव्यातून स्व.गोपीनाथ मुंडे तोडणी कामगारांची भूमिका जाहिर करत. स्व.मुंडे यांच्या निधनानंतर ना. मुंडे आता भूमिका ठरवित आहेत. नुकतेच खरवंडी कासार येथे तोडणी कामगारांचा मेळाव्यात ना.मुंडे यांनी संपाची आरोळी ठोकली. सावरगाव येथील दसरा मेळाव्यातही त्याचाच पुर्नरुच्चार झाला. आजही तोडणी कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप मिटणार नाही अशी भूमिका विविध संघटना वारंवार जाहीर करत आहेत.

यंदा मात्र, संपूर्ण राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात कायम दुष्काळी असलेल्या पाथर्डी तालुक्‍याला यावर्षी सर्वाधिक झळ पोहोचण्याची चिन्हे आहेत. अन्नधान्यापेक्षा पाणी व जनावरांच्या चाऱ्यांची सर्वांधिक टंचाई तालुक्‍याला जाणवणार आहे. ऑक्‍टोबर महिन्यातच तालुक्‍यात 53 टॅंकरद्वारे 40 गावांना 114 खेपा टाकून पाणीपुरवठा केलाजात आहे. वस्तुस्थिती याहीपेक्षा महाभयानक आहे. ग्रामीण भागातील जवळजवळ सर्वच वाडी-वस्त्यांवर टॅंकर सुरू करण्याची सुरू करण्याची मागणी आहे.

पाथर्डी शहराची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. तालुक्‍यातील छोटे-मोठे सर्वच तलाव कोरडे पडले आहेत. टॅंकर भरण्यासाठी जवळपास पाण्याचा उद्‌भव नसल्याने टंचाईचे नियोजन कागद रंगवण्यापलीकडे प्रशासन काहीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.

तालुक्‍याला रेल्वेची सुविधा नसल्याने लातूरप्रमाणे रेल्वेने पाणी आणणे सरकारला शक्‍य नाही. अन्नधान्य येईल, मात्र चारा व पाणी कुठून आणायचे या भविष्यातील संकटाने ऊस तोडणी कामगार हैराण आहेत. या दुष्काळातील जानेवारी, फेब्रुवारी व मार्च हे महिने कसे असतील. याची कल्पनाही करवत नाही. खरीप व रब्बी अशी दोन्हीही पिके वाया गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दुष्काळी भागातील जनतेला पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा उपलब्ध करणे, सरकार पुढील सर्वात मोठे आवाहन राहणार आहे. ही सगळी परिस्थिती ऊस तोडणी कामगारांच्या लक्षात आली आहे. निसर्ग कोपल्याने आपण अडचणीत आहोत. याची जाणीव ऊसतोडणी कामगारांना झाली आहे.

स्वतःच्या अडचणीवर मात करण्यासाठी तो स्वतः निर्णय घेण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्यातील ऊस पाण्याअभावी जळून लागल्याने कारखान्यांकडूनही उचल देण्यास हात आखडला जात आहे. यावर्षी ऊस तोडणीचे काम मिळाले नाही तर मुलाबाळाच्या रोजीरोटीसह जनावरांच्या चारा – पाण्याचे काय? या प्रश्नाने तो चिंताग्रस्त आहे.

गावावर राहून पिण्याचे पाणी व जनावरांना चारा कुठून आणायचा या भितीने कामगारांनी संपाची आरोळी झुगारून बेलापूरची वाट धरली आहे. तालुक्‍यातून आतापर्यंत 50 टक्के तोडणी कामगार कबिल्यासह रवाना झाले आहेत.तांडे, वाड्या, वस्त्यांवर कामगाराची बेलापूरला जाण्यासाठीची लगबग सुरू असून अश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी नातेवाईक, कुटुंब, वयोवृद्ध मुलाबाळासह रस्त्यावर थांबलेले भावनिक चित्र पहावयास मिळते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)