पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना मारहाण

file photo

सुट्टीवर असलेल्या जवानाचा दारू पिऊन धिंगाणा

पाथर्डी – सुट्टीवर आलेल्या जवानाने दारू पिऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात धिंगाणा घालत दोन पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. घड्याळाची चोरी होऊन सहा महिने झाले, मात्र तपास का लागत नाही ? असे म्हणत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या जवानाचा रुद्रावतार पाहून पोलिसही चक्रावले, काही पोलीस कर्मचाऱ्यांनी बाहेर जावून थांबणे पसंद केले. बऱ्याच वेळानंतर पोलिसांनी एकत्रित येऊन या बेधुंद जवानाला जेरबंद केले. जवानाबरोबर झालेल्या झटापटीत दोन पोलीस जखमी झाले. पाथर्डी पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेची चर्चा तालुक्‍यात सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेतील संशयित आरोपी अंबादास जालिंदर ढाकणे ( वय 35, रा. ढाकणवाडी) हा बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन पोलीस ठाण्यात आला. यावेळी ठाणे अंमलदार अरविंद चव्हाण ड्युटीवर होते. ढाकणे याने सरळ ठाणे अंमलदाराच्या केबीनमध्ये येऊन माझे घड्याळ चोरीला जाऊन सहा महिने झाले, त्याचा अजून तपास का लागला नाही, तुम्ही नेमके काय करता ? असा प्रश्न करत चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

यानंतर चव्हाण यांनी ढाकणे याची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी ढाकणे यांने आरडाओरड करत चव्हाण यांना मारहाण केली. वाद सोडवण्यासाठी गेलेले पोलीस कॉन्स्टेबल विजय सुपेकर यांनाही या जवानाने मारहाण केली. यावेळी अंबादास ढाकणे याचा रुद्रावतार पाहून एका पोलिसाने स्वतःला बंद खोलीत कोंडून घेतले तर चव्हाण व सुपेकर हे पोलीस स्टेशनच्या बाहेर आले.

या ठिकाणी काही नागरिक आपल्या कामासाठी आले असताना त्यांनी उगीच कटकट नको म्हणून पोलीस स्टेशन आवारात असलेल्या तहसीलदारांच्या गाडीआड लपणे पसंद केले. पोलीस स्टेशनच्या बाहेर गेलेल्या चव्हाण व सुपेकर यांनी तातडीने इतर पोलिसांना फोन करत बोलावून घेतले. यानंतर अनेक पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात आले व त्यांनी ढाकणे याला घेरले असता त्याने पळून जायचा प्रयत्न केला, मात्र त्याला पोलीस नाईक संजय आव्हाड यांनी पाठीमागून मिठी घालत पकडले. यानंतर सर्व पोलिसांनी मिळून ढाकणे याची चांगलीच धुलाई करत त्याला जेरबंद केले.

या संदर्भात पोलीस कर्मचारी प्रल्हाद नागलोत यांनी आंबादास ढाकणे याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणने,पोलिसांना मारहाण करणे असा गुन्हा नोंदवला आहे. पोलिस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस स्वतःचे संरक्षण करू शकत नसतील तर नागरिकांचे काय? या प्रश्नाविषयी चर्चा तालुकाभर चवीने चघळली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)