पाथर्डी नगरपालिकेत रणकंदन

सर्वसाधारण सभा : गाळे हस्तांतरण, स्मशानभूमी आरक्षण, स्वच्छतेवर सत्ताधारी धारेवर

पाथर्डी -नगरपालिका मालकीच्या गाळ्यांचे परस्पर झालेले हस्तांतरण, लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर प्रस्तावित आरक्षण, शहरात बसवण्यात आलेले निकृष्ट पथदिवे, शहर स्वच्छतेचा बोजवारा अशा विविध विषयांवर पालिकेच्या मासिक सर्वसाधारणसभेत गरमागरम चर्चा झाली.

नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. सभेला उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, गटनेते नंदकुमार शेळके, आरोग्य विभागाचे सभापती नामदेव लबडे, बांधकाम सभापती रमेश गोरे, नगरसेवक प्रवीण राजगुरू, प्रसाद आव्हाड,बंडू पाटील बोरुडे, महेश बोरुडे, अनिल बोरुडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपाली बंग, सुनीता बुचकुल, संगीता गटानी, आशिया मणियार, सविता भापकर, दुर्गा भगत,माधुरी आंधळे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख हजर होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात झाली.

पालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांचे करार संपलेले आहेत. गेली आठ वर्षे नव्याने करार का केले नाहीत, असा प्रश्न बंग यांनी उपस्थित केला. नव्याने करार करण्यात आलेले नसतानाही गाळ्यांची परस्पर खरेदी विक्री व्यवहार होऊन हस्तांतर करण्यात आलेले आहेत. नगरपालिकेचे गाळे परस्पर विकण्याचा अधिकार कुणालाही नाही. संबंधित बेकायदेशीर हस्तांतरण व्यवहार रद्द करून या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव डॉ. गर्जे यांनी मांडला. त्याला सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दर्शवला.

शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. घंटागाडी अनेक प्रभागात जात नाही. शहरातील स्वच्छता ठेवण्यास संबंधित ठेकेदार अपयशी ठरत आहे. कचरा संकलन करण्यास विलंब होत असल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शहरात रोगप्रतिबंधक फवारण्या व्हायला हव्यात; मात्र संबंधित ठेकेदाराकडून नियमाचे पालन होत नाही, अशी टीप्पणी स्वच्छता विभागांकडून सभागृहात वाचण्यात आली. स्वच्छता व आरोग्याबाबत कुठलीही तडजोडीची भूमिका ठेवली जाऊ नये. संबंधित कंपनीला दोन वेळा दंड होऊनही कामांत सुधारणा होत नसेल, तर संबंधित ठेका रद्द करण्यात यावा, अशी भूमिका डॉ. गर्जे यांनी मांडली.

लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर प्रस्तावित आरक्षणाबाबत आव्हाड यांनी प्रश्‍न उपस्थित केला. लिंगायत समाजाच्या भावना समजावून त्यांच्या स्मशानभूमीवर आरक्षण टाकू नये, असा ठराव घ्यावा व धामणगाव रोडलगत असलेल्या टेके यांच्या भूखंडावरील आरक्षण हटवताना काय काय निकष लावले, याचा विचार होऊन कुणावरही अन्याय होणार नाही असा सुवर्णमध्य काढण्याची मागणी केली. नगरसेवक बंडू पाटील बोरुडे यांनी लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा विषय व धामणगाव रोडलगत असलेल्या टेके यांच्या आरक्षित जमिनीचा विषय हेतुपुरस्सर चालवलेला आहे, असा आरोप केला.

लिंगायत समाजाच्या सोळा एकर जमिनीवर स्मशानभूमीचे आरक्षण होते. त्यांच्या तत्कालीन अध्यक्षांनी हटवण्याबाबत समितीसमोर लेखी विनंती केलेली आहे. धामणगाव रोडलगत असलेल्या टेके यांच्या जमिनीवर पालिकेने विनाकारण आरक्षण टाकलेले आहे. गेली चाळीस वर्षे आरक्षण हटवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांची बाजू समजावून घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही, यासाठी सभागृहाने प्रयत्न करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पिण्याच्या पाईपलाईनला मंजुरी

24 वर्षे पूर्ण झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पालिका हद्दीतील अपंग कर्मचाऱ्यांना तीन टक्के राखीव निधीचे वाटप करण्याबाबत ही चर्चा करण्यात आली. निलंबित कर्मचारी बाळू बोरुडे व ईश्वर जाधव यांना लेखी घेऊन पुन्हा कामावर रुजू करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. 14 व्या वित्त आयोगातून शहरात शौचालय, मुतारी बांधकामास मंजुरी देण्यात आली. वैशिष्ट्‌यपूर्ण योजनेतून शहरातील वंचित भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)