महिलेकडील रॉकेलचा ड्रम हिसकावल्याने अनर्थ टळला

पाथर्डी – पालिकेच्या अतिक्रमण विभागावर मनमानी कारभाराचे व भ्रष्टाचाराचे आरोप करत शहरातील मीना बांगर या महिलेने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत येऊन अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मासिक सर्वसाधारण सभा सुरू असतानाच अचानक उद्‌भवलेल्या या प्रसंगाने सभागृहात एकच गोंधळ उडाला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी महिलेच्या हातातील रॉकेलचा ड्रम हिसकावून घेतल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्‍वास सोडला.

नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष डॉक्‍टर मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. सभागृहाच्या खिडकीतून डोकावणारा जमाव विपरीत घटनांचे संकेत देत होता. सभा सुरू होऊन काही अवधी झाला तोच शहरात राहणाऱ्या मीना बांगर यांनी पालिका सभागृहात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांना महिला सेवकांनी दरवाजात अडवून मागे पाठवले. मात्र पालिका प्रशासनाचा विरोध धुडकावत बांगर सभाग्रहातील अध्यक्षांच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पोहोचल्या.

त्यांनी हातात लपवून रॉकेलचा ड्रम आणला होता. ड्रमचे झाकण उघडून अंगावर रॉकेल ओतण्याचा प्रयत्न उपस्थित कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला. तात्काळ त्यांच्या त्यातील ड्रम काढून घेण्यात आला. अचानक घडलेल्या या घटनेने सभागृहात एकच खळबळ उडाली. “”माझ्या वडिलांची पाथर्डी शहरात जागा आहे. अद्यापपर्यंत वाटप झालेले नसतानाही संबंधित काही लोक या जागेवर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करत आहेत.

बांधकाम थांबवण्याबाबत वेळोवेळी अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली. मात्र अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आर्थिक देवाण-घेवाण करून संबंधित प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बांगर यांनी सभागृहात केला. सभा संपल्यानंतर तुमचा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन नगराध्यक्ष डॉक्‍टर गर्जे यांनी संबंधित संतप्त महिलेला देऊन शांत केले.

लहान मुलांसमवेत एकाची घोषणबाजी…

आसरानगरमध्ये राहणाऱ्या शहनवाज शेख या युवकाने आपल्या लहान दोन मुलांसमवेत सभागृहात प्रवेश केला. घरासमोरील चिखल झालेल्या रस्त्याचा फोटो गळ्यात लटकून शेख तावातावाने पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. आम्ही शाळेत कसे जावे, असे त्या फलकावर मजकूर लिहिला होता. पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत शेख यांनी रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावल्या शिवाय बाहेर जाणार नाही असा पवित्रा घेतला. संबंधित रस्त्यासाठीचा निधी वर्ग झालेला असून तात्काळ काम सुरू होईल, असे आश्‍वासन डॉक्‍टर गर्जे यांनी दिल्यानंतर शेख यांनी आंदोलन मागे घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)