आ. औटींच्या विरोधात मराठा समाज गुन्हा दाखल करणार

पारनेर : मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली.

पारनेर – पारनेर तालुक्‍यातील वडनेर येथील जाहीर सभेत मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य करणाऱ्या शिवसेनचे आमदार विजय औटी यांनी आठ दिवस उलटूनही मराठा समाजाची माफी न मागितल्याने त्यांच्याविरुद्ध बुधवारी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर व पारनेर तालुका समन्वयक संजय वाघमारे यांनी माहिती दिली.

पारनेर विश्रामगृह येथे रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे आ.औटी यांनी मात्र आपण असे काही बोलले नसल्याचा कांगावा करीत आहे. सोशल मिडियावर जी ध्वनिचित्रफित व्हायरल झाली ती खोटी असून तिच्यामध्ये फेरफार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. वडनेर येथील ज्या कार्यक्रमात आ. औटींनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केले त्याला आक्षेप आहे. त्या कार्यक्रमाचे फेसबुकवर थेट प्रसारण करण्यात आले होते. थेट प्रसारणात छेडछाड करणे शक्‍य नाही. त्यामुळे या ध्वनीचित्रफितीची पण चौकशी करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली.

मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या आ.औटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा म्हणजे सत्य बाहेर येईल. यासाठी पारनेर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलेले आहे. परंतू त्यावरही काही कार्यवाही न झाल्याने बुधवारी सकाळी 11 वाजता पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी आ. औटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ अथवा दिरंगाई केली तर न्यायालयाच्या माध्यमातून यांच्यावर खाजगी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या ज्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचे यावेळी ठरले आहे. या बैठकीत संजीव भोर म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासह अनेक मागण्या प्रलंबित असून लोकप्रतिनिधी त्यावर आवाज उठवणे ऐवजी मराठा समाजाचा अपमान करत आहे. त्यामुळे त्यांनी दिलगिरी तर सोडाच यासंबंधी स्पष्टीकरण द्यायला त्यांना वेळ नसल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी मोठ्या संख्येने पारनेर पोलीस ठाण्यात जमण्याचे आवाहन भोर यांनी केले आहे.

मराठा समाजास अवमानकारक शब्द वापरणारे आ. औटींचा निषेध करणे म्हणजे राजकारण असे जर कोणी म्हणत असेल तर ती पळवाट व निव्वळ लबाडी, लाचारी आहे. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी रोहकले, तुषार औटी, गणेश कावरे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष किरण तराळ, योगेश मते, सचिन नगरे, एकनाथ बालवे, राहुल गुंड, संतोष भोर, प्रदिप गाडगे, राजेंद्र म्हस्के, अनिकेत औटी, रायभान औटी, संजय देशमुख, शरद झावरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)