शेवगाव-पाथर्डीसाठी 180 कोटींची नळपाणी योजना

ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे : महात्मा फुले भाजी मंडईच्या इमातरीचे उद्‌घाटन

शेवगाव  – स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या काळातच शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना झाली होती. ती जुनी झाल्याने आता 180 कोटी रुपयांची खर्चाची नविन योजनाही लवकरच केली जाणार आहे. अशी एक ना अनेक, या अगोदर कधीही न झालेली कामे मार्गी लावली जातील, असा दिलासा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे दिला.

शेवगावमध्ये स्व. राजीव राजळे यांच्या आग्रहावरून पंकजा मुंडे यांनीच उपलब्ध केलेल्या सव्वाकोटी रुपये खर्चाच्या निधीतून महात्मा फुले भाजी मंडईच्या वास्तूचे उद्‌घाटन मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झाले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे होत्या. मंचावर ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, उदयोजक अमित पालवे, बीडच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, पाथर्डीच्या सभापती चंद्रकला खेडकर, तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या की, शेवगावच्या नगरसेवकांना उशीरा का हईना जाग आली. तीन मुस्लिम बांधवांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मुस्लिम समाजासाठी भारतीय जनता पक्षाचे काय योगदान आहे हे त्यांना आता समजेल. शेवगावच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी आपण घेतली असल्याचे सांगून विकासाची बासुंदी तयार करण्यासाठी आपल्या सहकार्याच्या साखरेच्या गोडव्याची आवश्‍यकता आहे. विरोधकांच्या मिठाचा खडा त्यात पडायला नको. मी वाढायला घेतले आहे. शेवटच्या पंगतीपर्यंत येणार असून आपणास विकासाचा लाडू मिळणार आहे. त्यासाठी फक्‍त थोडी कळ काढा.

नगरपालिकेत सत्ता नसतानाही स्व. राजीव राजळे यांनी शहराच्या भाजी मंडईसाठी निधी मागितला होता. त्या कामाचा लोकार्पण सोहळा होत असताना स्व. राजळे व्यासपिठावर नाहीत याची खंत वाटते. आता राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन खचू लागली आहे. जातीपातीला मुठमाती देवून अशीच एकजूट ठेवा आणि विकासाच्या कामाची गती पहाच. असे त्या म्हणाल्या.

मुंडेंचे मतदारसंघावर प्रेम…

आमदार राजळे म्हणाल्या की, शेवगाव शहरात राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र माझ्या मुस्लिम बांधवांनी काळाची पावले ओळखली. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. जिल्ह्यात खासदार आणि आमदार आपलेच आहेत. यामुळे शहराच्या विकासास गती मिळणार आहे. स्मार्ट सिटी बनवून शेवगावचा चेहरामोहरा बदलून टाकू. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखेच पंकजा मुंडे यांचे या मतदारसंघावर, आमच्या कुटूंबावर प्रेम आहे. म्हणून कधी नव्हे, एवढी कोट्यवधींची जलसंधारणाची, रस्त्याची आणि विकासाची शाश्‍वत भरीव कामे येथे साकारली आहेत. विकासाच्या महामार्गावर नेण्याचे काम केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)