निळवंडे पाटग्रस्त शेतकरी आक्रमक!

अकोले - पाटग्रस्त शेतकऱ्यांनी निळवंडे पाटाचे काम बंद पाडले.

तालुक्‍यातील सहा ठिकाणी पाडले कालव्याच्या खोदाईचे काम बंद

अकोले  – बंदिस्त पाईप कालवे करा, सुधारित भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला दिला जावा, कालवे खोदाईच्या पाठविलेल्या नोटिसा रद्द करा, या व अन्य घोषणा देत शेतकऱ्यांनी रविवारी (दि. 25) तालुक्‍यातील सहा ठिकाणी कालवे खोदाईचे काम बंद पाडले.

अकोले तालुक्‍यातील निळवंडेचे कालवे हे पाईप कालवे करून ते जमिनी खालून न्यावेत, या मागणीसाठी अकोले तालुक्‍यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. बागायती व सुपीक जमिनी पाटात जात असल्याने त्या वाचविण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संबंधित सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणतीही चर्चा न करता पाटबंधारे विभागाने कालवे पाट खोदाई कामे तालुक्‍यात केली आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

कुंभेफळ गावात तीन ठिकाणी, खानापूर गावात एका ठिकाणी सुरू असणारे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता दडपशाही करून पाटबंधारे विभाग हे काम पूर्णकरू पाहात असेल, तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली.

निळवंडे लाभ क्षेत्रातील 182 गावांना पाणी मिळावे, यासाठी पाण्याचा थेंबना थेंब जपून वापरावा लागणार आहे.कालव्यातून पाणी वाहून नेल्यास 40 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होईल. ही बाब लक्षात घेता कालव्याऐवजी बाष्पीभवन व पाझर अत्यल्प होईल. अशा प्रकारचे पाईप कालवे करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. पाणी चोरीला आणि पाण्याच्या गैरवापराला यातून आळा बसेल. वर्षानुवर्षे दुष्काळाची झळ सोसत असलेल्या लाभ क्षेत्रातील 182 गावांच्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल. अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचतील, असा मार्ग काढण्याची आवश्‍यकता असल्याचे खंडू वाकचौरे म्हणाले.

गुजरात येथील पाईप कालवे प्रकल्पाचा तुलनात्मक अभ्यास करून निळवंडेसाठी त्यातील व्यावहारिकता तपासण्याची मागणी या संतोष तिकांडे, तुकाराम मोरे, विकास कोटकर, बाळासाहेब वाळुंज, सुनील धुमाळ, डॉ. रामहरी चौधरी, देविदास धुमाळ, दीपक वैद्य, रामनाथ घोलप, सुभाष मालुंजकर, चंद्रभान देशमुख, सुभाष देशमुख, अनिल चासकर, विकास कोटकर, प्रदीप वाकचौरे, गणेश शेटे, महेश मुंडे, यशवंत पांडे, गणपत कोटकर, अनिकेत भालेराव, नवनाथ पांडे, सचिन चौधरी, किसन राक्षे, सुमेध मालुंजकर, शंकर वाळुंज, रावसाहेब दौड, अशोक राक्षे आदींनी केली. आ. वैभवराव पिचड यांनाही या आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता व त्यांचे म्हणणे समजून न घेता त्यांच्या जमिनी काढून घेण्याची आगळीक जलसंपदा विभागाने सुरू केली आहे. शेतकरी त्यामुळे संतप्त झाले आहेत, असे सांगून तालुक्‍याचे वातावरणही त्यामुळे बिघडण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली. अशा पार्श्वभूमीवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी व चर्चेसाठी समोर यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)