आ. अौटींचे तडजोडीचे राजकारण संपवणार

नीलेश लंके : सर्वसामान्यांना अपेक्षित बदल विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत दिसणार

नगर – पक्ष वेगवेगळे अन्‌ नेते अनेक असले, तरी पारनेर तालुक्‍यात गेली 14 वर्ष आमदार विजय औटी यांनी “ऍडजेस्टमेंट’चे राजकारण केले. त्यातून एकमेकांचे हीत जोपासले गेले आहे. या ऍडजेस्टमेंटला आता पारनेरकर वैतागले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला बदल विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकीत होणार असल्याचा विश्‍वास शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी व्यक्‍त केला.

-Ads-

श्री. लंके यांनी दैनिक प्रभात कार्यालयास आज सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी “प्रभात’च्या टीमबरोबर संवाद साधला. ते म्हणाले, की तालुक्‍यात आ. औटी यांनी नात्यागात्याचे व सोयीचे राजकारण केले. आमदारकीच्या माध्यमातून विकासकामे केल्याचा दावा ते करतात; परंतु शासकीय योजना वगळता वेगळी कोणती ठोस कामे त्यांनी केली, हे सांगावे. रस्ते आणि सभामंडप सोडले, तर कामे दिसत नाही. त्यात रस्त्यांची कामे पाहिल्यानंतर खड्डयात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. जलयुक्‍त शिवार योजनेतील कामेदेखील तालुका दुष्काळी असल्याने झाली आहेत. त्यात आमदारांचे कोणतेही योगदान नाही. उलट, विकासकामे होणार नाहीत, याची काळजी हे आमदार घेत आले आहेत. तालुक्‍यात एकही वेगळे व ठोस काम आमदारांना करता आले नाही. केवळ राजकीय ऍडजेस्टमेंट अन्‌ विकासाच्या गप्पा तेवढ्याच त्यांनी आजवर केल्या आहेत.

तालुक्‍याची कामधेनू म्हणून ओळख असलेला पारनेर कारखाना चालू करण्यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न केले नाही. सुपे येथील औद्योगिक वसाहत वाढविण्यासाठी अन्‌ मोठ्या कंपन्या आणण्यासाठी आमदारांनी काय योगदान दिले, असा सवाल लंके यांनी केला. मोठे उद्योग आले असते, तर तालुक्‍यातील बेरोजगारांना रोजगार मिळाला असता; पण तेही त्यांनी होऊ दिले नाही. तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी मोठ्या कंपन्या आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा यांनी विरोध केला. पाचपुतेंना त्याचे श्रेय मिळेल, म्हणून यांनी कंपन्यांना विरोध करून पारनेर तालुक्‍याचे मोठे नुकसान केले. त्यांच्यामुळेच सुप्याची एमआयडीसी वाढली नाही. पारनेरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय नाही, की अन्य उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण केली नाही. पाण्याचा प्रश्‍नदेखील त्यांना सोडविता आला नाही. तालुक्‍यात 14 गावेच कालव्याच्या लाभक्षेत्रात आहेत. उर्वरित तालुका आजही दुष्काळी आहे. उन्हाळ्यात टॅंकरनेच पाणीपुरवठा होतो. टॅंकरमुक्‍त तालुका करता आला नाही. त्यामुळे आज तालुका विकासपासून वंचित राहिला असल्याची घणाघाती टीका लंके यांनी वारंवार औटी यांचा नामोल्लेख करून केली.

ते म्हणाले, “”तालुक्‍यात शिवसेना एकदम वाढली नाही. त्यासाठी माझे परिश्रम आहेत. संघटना मजबूत होती, म्हणून औटी आमदार झाले. विकासकामे तर आवश्‍यक आहेत; पण त्याबरोबर पक्षसंघटन महत्वाचे आहे आणि हे संघटन मी उभे केले होते. सर्वसामान्यांचे लहान-लहान प्रश्‍न व समस्या सोडविल्या. लोक आमदारांकडे कामासाठी जाण्याऐवजी माझ्याकडून कामे करून घेत होते. कारण आमदारांकडे जाणाऱ्याचा अपमान होत होता. आमदार कधीही लोकांशी व्यवस्थित बोलत नव्हते. स्वाभिमानाची ऐशी तैसीच आमदार करीत होते. त्यामुळे काम घेवून जाण्यास लोक घाबरतात. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली, त्यांचे लहान-सहान प्रश्‍न मार्गी लावले, तरी ते खूश होतात. त्यामुळे मी तळागाळातील झोपडीत राहणाऱ्यांचे प्रश्‍न सोडवित आलो आहे. आज सर्वसामान्यांशी माझी नाळ जोडली गेली आहे. राज्यातील इतर लोकप्रतिनिधी लोकांची अडवणूक करीत नाहीत; पण राज्यात पहिला लोकप्रतिनिधी असा आहे, की ज्याने लोकांची अडवणूक केली. त्यांची कामे होऊ नयेत, म्हणून पत्र दिले. त्याविरोधात मला तीन दिवस उपोषण करावे लागले. 214 जणांचे प्रस्ताव मंजूर करावे लागले.”

आज लंके प्रतिष्ठाणला तालुक्‍यात मोठी प्रतिष्ठा मिळाली, ती कामामुळेच. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आजवर अनेक कामे व उपक्रम राबविण्यात आले; पण ते जाहीर होत नव्हते. 27 फेब्रुवारीपासून ते जाहिरपणे होऊ लागले. लोकांना फरक लक्षात यायला लागला आहे.प्रतिष्ठाणच्या कार्यक्रमांला हजारोंची गर्दी दिसत आहे; पण आमदारांच्या कार्यक्रमाला काही ठिकाणी 32, तर काही ठिकाणी सात-आठ लोक हजेरी लावताना दिसत आहेत. हा फरक लक्षात आणून देऊन लंके यांनी आमदारांवरील टीकेचा भडीमार पुढे चालूच ठेवला. लोक आता आमदारांकडे जात नाहीत. त्यामुळे सर्वसामन्यांना अपेक्षित असलेला बदल 2019 मध्ये नक्‍की होणार हे दिसू लागले आहे, असा दावा त्यांनी केला.

आमदारांमुळे झावरे सभापती

पंचायत समितीचा सभापती शिवसेनेचा होणे अपेक्षित होते. तसे मी जुळवूनदेखील आणले होते; पण आमदारांच्या मनात ते नव्हते. सभापती निवडीच्या आदल्या दिवशी सकाळी राहुल झावरे आमदारांच्या कार्यालयात येतात अन्‌ चर्चा करून निघून जातात, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. तरीही मी आवश्‍यक संख्याबळ जुळवून आणले; पण आमदारांना राहुलला सभापती करायचे होते. जुळविलेले समीकरणदेखील त्यांनी धुळीस मिळविले. त्यामुळे शिवसेनेऐवजी कॉंग्रेसचे झावरे सभापती झाले.

लंकेच्या हृदयात बाळासाहेब

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर नीलेश माझी शिवसेनेतून हकालपट्टी झालीच नसती. आजही बाळासाहेब माझ्या हृदयात आहेत. बाळासाहेब ही कोणाची जहागिरी नाही. त्यांच्यावर अतूट प्रेम आहे. अजूनही उद्धव ठाकरे व बाळासाहेबांचे फोटो माझ्या दालनात आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणले.

24 तास 365 दिवस

तालुक्‍यात कोणाचेही कोणतेही प्रश्‍न असो; नीलेश लंके त्याच्या मदतीला जाणार. कधी फोन आला, तरी लंके त्यांच्या मदतीसाठी धावून जातो. त्यामुळे तालुक्‍यात 24 तास 365 दिवस असे ब्रीदवाक्‍य माझ्या बाबतीत झाले आहे. कोणीही संकटात आले, तर त्याच्या मदतीला धावून जाणे हे माझे कर्तव्य आहे. 15 मिनिटांत माझी मदत पोचलेली असते, असे त्यांनी सांगितले.

तर कोरड्या विहिरीत उडी घेतली असती!

तालुक्‍यात आमदार विजय औटी अन्‌ नीलेश लंके असे समीकरण झाले होते. हृदयापासून त्यांच्यावर प्रेम करीत होतो. त्यांचा आदेश म्हणजे सरआँखोपर होता. त्यांचा स्पर्धक म्हणून मी कधीच मला पाहिले नव्हते. त्यांना तसे वाटत होते. त्यांनी मला एक वर्षापूर्वी सांगितले असते, तर त्यांच्यासाठी मी कोरड्या विहिरीत उडी मारली असती; पण स्पर्धक म्हणून त्यांनी मला पाहिले. त्यातून ते मला सातत्याने डावलायला लागले. माझ्याच विरोध कटकारस्थाने करीत राहिले. आता मात्र मी त्यांच्या कामाच्या बाबतीत त्यांचा स्पर्धक झालो आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली

आपल्याला बच्चू कडू व्हायचेय

आपले काम, आपण सुरू केलेले दौरे पाहता आपल्याला एखाद्या पक्षाने उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला, तर स्वीकारणार का, या प्रश्‍नावर लंके म्हणाले, की कोणत्याही पक्षात जाण्याची माझी इच्छा नाही. शिवसेनेत अहोरात्र झडलो, संघटना वाढविली. त्यासाठी रक्‍ताचे पाणी केले; पण आता त्याचा काहीच उपयोग झाला नाही. एक पक्ष अनुभवला.त्यामुळे दुसरा पक्ष अनुभवावा असे आता वाटत नाही. कोणी कितीही आमिषे दाखविली, तरी आपल्याला आमदार बच्चू कडू यांच्यासारखे सर्वसामन्यांचे कामे करणारा नेता व्हायचे आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपले दैवत असून आ. कडू हे आपले आदर्श आहेत.

एकही संस्था शिवसेनेकडे नाही

औटी पारनेरचे आमदार असताना बाजार समिती, पंचायत समिती, नगरपालिका, खरेदी विक्री संघ अशा कोणत्याही संस्थेवर शिवसेनेचे वर्चस्व नाही. त्यांनी तसा प्रयत्नही केला नाही. संस्थात्मक संघटन त्यांनी केले नाही. पारनेर तालुक्‍यात एकही संस्था त्यांना उभारता आली नाही, अशी टीका लंके यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)