नगर जिल्ह्यात 9 लाख 2 हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा

387 गावे, 2 हजार 134 वाड्यांना 550 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू

नगर -जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या एक महिन्यांतच टॅंकरची संख्या साडेपाचशेच्या पुढे गेली आहे. सध्या 387 गावे व 2 हजार 134 वाड्यांवरील सुमारे नऊ लाख 2 हजार 779 लोकांना टॅंकरचे पाणी प्यावे लागत आहे. मार्च महिन्यात ही स्थिती असल्याने पुढील उन्हाळ्याचे दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे यंदा टॅंकरची संख्या हजारी पार करेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

यंदाचा पावसाळा संपूर्ण कोरडा गेला. पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून निसटला. सुदैवाने धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांचे साठे बऱ्यापैकी आहेत. परंतू आता या धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी झाला आहे. ऑक्‍टोबरपासूनच जिल्ह्यात टंचाईने डोकेवर काढल्याने टॅंकर सुरू करण्यात आले.

दरम्यान,जिल्हाधिकाऱ्यांनी धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवत जुलैपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले. एकीकडे ऑक्‍टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या चार महिन्यांत जिल्ह्यात पारा निच्चांकी घसरला असला तरी दुसरीकडे टॅंकरची संख्या भर हिवाळ्यातही वाढतच गेली. आजअखेर जिल्ह्यात 550 टॅंकरने 9 लाख 2 हजार 779 लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून टॅंकरची मागणी वाढत असून त्या दृष्टीने प्रशासनाकडून देखील तातडीने टॅंकर सुरू केले जात आहे.

सध्या 545 टॅंकर चालू असून त्यात 23 शासकीय तर 522 खासगी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अजून एप्रिल व मे असे तीव्र उन्ह्याळ्याचे दोन महिने जायचे आहेत. या काळात तीव्र पाणी व चाराटंचाई भेडसावणार असल्याने टॅंकरची संख्या एक हजारच्या वर जाण्याची दाट शक्‍यता आहे. सध्या एकटा श्रीरामपूर तालुका वगळता उर्वरित सर्वच तालुक्‍यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सार्वधिक पाथर्डी तालुक्‍यात 135 टॅंकर चालू आहेत.

सध्या तरी प्रशासनाकडून टंचाई उपाययोजनेत केवळ टॅंकरने पाणीपुरवठा करणे ही प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहे. अन्य योजनांसाठी पाण्याचे स्त्रोत नसल्याने नळपाणीयोजना प्रभावीपणे चालविणे अशक्‍य झाले आहे. आज ग्रामीण भागातील स्वतंत्र पाणीयोजना देखील बंद पडल्याने त्या ठिकाणी टॅंकर हा एक पर्याय उरला आहे.

टॅंकरकडेच डोळे

ग्रामीण भागात टॅंकर आल्यानंतर लगबगीने पाणी भरणे हेच लोकांचे मुख्य काम सध्या झालेले आहे. शेतात काडीचेही काम नाही अन्‌ गावातील विहिरी, बारवात पाण्याचा टिपका नसल्याने सकाळपासून टॅंकरची वाट पाहणे हीच महिला वर्गाची ड्युटी बनली आहे. सार्वजनिक विहिरीत टॅंकरचे पाणी सोडले की एकच झुंबड उडते अन्‌ अर्ध्या तासात विहीर पुन्हा रिकामी केली जाते. काही ठिकाणी गल्लोगल्ली जाऊन प्रतिमाणसी मोजून पाणी दिले जाते.

तालुकानिहाय टॅंकरची स्थिती

संगमनेर- 33 गावे 187 वाड्यांना 42 टॅंकर, अकोले- 1 गाव, 5 वाडयांना 1 टॅंकर, कोपरगाव- 3 गावे 37 वाड्यांसाठी 6 टॅंकर, राहुरी- 2 गावे 1 टॅंकर, नेवासे- 3 गावे 3 वाड्यांना 3 टॅंकर, राहाता- 1 गाव 19 वाड्यांना 3 टॅंकर, नगर – 30 गावे 175 वाड्यांना 44 टॅंकर, पारेनर- 68 गावे 456 वाड्यांना 103 टॅंकर, पारनेर नगर पंचायत- 1 गाव 35 वस्त्यांवर 16 टॅंकर, पाथर्डी- 100 गावे 541 वाड्यांना 135 टॅंकर, शेवगाव- 34 गावे 123 वाड्यांना 41 टॅंकर, कर्जत- 57 गावे 349 वाड्यांसाठी 71 टॅंकर, जामखेड- 32 गावे 29 वाड्यांना 35 टॅंकर, श्रीगोंदा- 21 गावे 169 वाड्यांसाठी 30 टॅंकर. जामखेड नगरपालिका- 1 गाव 6 वाड्यांना 11 टॅंकर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)