सामाजिक सौहार्दाची भावना पुढे नेऊ

पालकमंत्री प्रा. शिंदे : गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

नगर – सामाजिक भान जपत गणेशोत्सव साजरा करण्याची आपली परंपरा आहे. अनेक गणेश मंडळांनी ती पुढे नेण्याचे काम केले आहे, असे कौतुकोद्‌गार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी काढले. या वर्षी गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र येत आहेत. हे दोन्ही सण शांततेत साजरे करून आपण सामाजिक सौहार्दाची ही भावना अधिक पुढे नेऊ, असे आवाहन त्यांनी केले.

पोलिस मुख्यालयात जिल्हयातील 2017 मध्ये उत्कृष्ट गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा गौरव तसेच पोलीस क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर सुरेखा कदम, खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, रोहिदास पवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, अरुण जगताप आदी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, “”नगर जिल्हयाला गणेशोत्सव व मोहरम उत्सवाची मोठी परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवत यंदाचा उत्सवही शांततेत साजरा करावा, यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने पुढाकार घ्यावा. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कौतुकास्पद काम होते आहे. “एक गाव एक गणपती’ ही संकल्पना अनेक गणेश मंडळांनी राबविली. अनेक मंडळांनी आपल्या कार्यातून आदर्श उभा केला. जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. पोलिस प्रशासन आपल्या संरक्षणासाठी आहे. त्यांना सहकार्य करण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

खा. गांधी म्हणाले, की नगरचा मोहरम उत्सव देशात प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाची जिल्हयाला मोठी परंपरा आहे. दोन्ही उत्सव एकत्रितपणे साजरे करून जिल्हयाचा लौकिक वाढविण्यासाठी प्रत्येकाने या उत्सवात सहभागी व्हावे.
द्विवेदी, शर्मा यांची भाषणे झाली. या वेळी 2017 मध्ये उत्कृष्टरित्या गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा गौरव करण्यात आला. पारनेर तालुक्‍यातील सुप्याच्या एक गाव एक गणपती मंडळाला प्रथम, संगमनेरच्या महाराणा प्रताप युवक मंडळाला द्वितीय तर कर्जतच्या गुरुवार क्‍लब गणेश मंडळाला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या वेळी शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासनाचे अधिकारी व जिल्हयातील गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)