नगर : अवैध मद्यविक्री, वाहतूकीवर करडी नजर

संग्रहित छायाचित्र

राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना

नगर – लोकसभा निवडणुकीतील अवैधरित्या मद्यविक्री आणि वाहतूक होणार नाही, यासाठी राज्या उत्पादन शुल्क विभागाने दक्ष राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिल्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिल्या आहेत.

पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी काळात याबाबत दक्षतेच्या सूचना केल्या. विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपधीक्षक सी. पी. निकम आदी उपस्थित होते.

अवैध मद्यनिर्मिती करणारे सराईत गुन्हेगार, हातभट्टी निर्मितीचे केंद्र यावर करडी नजर ठेवून असा प्रकारांना आळा घालण्यात येणार आहे. अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तींवर महसूल विभागासह एकत्रितपणे कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले आहेत. महापालिका निवडणूकीत ज्याप्रमाणे अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीला जरब बसली, तशीच कार्यवाही अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागातील निरीक्षकांना ज्या अनुज्ञप्तींची मद्यविक्री मागील वर्षाच्या तुलनेत 30 टक्के अधिक आहे, अशा अनुज्ञप्तींवर पथकाची विशेष नजर राहणार आहे. अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी दोन विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 12 विधानसभा क्षेत्रनिहाय अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आली असून अशा प्रकारच्या अवैध मद्यविक्री आणि वाहतूकीवर प्रतिबंधासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे.

निवडणूक आयोगाचे दिव्यांगांसाठी ऍप

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दिव्यांगाना मतदान करणे सोईचे व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दिव्यांगांची मतदारनोंदणी व्हावी, यासाठी बीएलओंनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय भारत निवडणूक आयोगाने आता दिव्यांगाना मतदारनोंदणी आणि मतदानप्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी पीडब्ल्यूडी ऍप विकसित केले आहे. दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हील चेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे ऍप वापरता येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)