मुळा धरणाच्या पायथ्याशी शेतकऱ्यांचा ठिय्या

मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नये, या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी मुळा धरणाच्या पायथ्याशी ठिय्या मांडला.

धरणाजवळ तणाव; जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध 

राहुरी विद्यापीठ – मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नये, या मागणीसाठी नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी मुळा धरणाच्या पायथ्याशी ठिय्या मांडला. त्यांनी शासनाचा निषेध केला. दरम्यान, पोलीस व आंदोलक आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचे आदेश गोदावरी खोरे मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. हे पाणी सोडण्याच्या विरोधात नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. राहुरी तालुक्‍यातील बारागाव नांदूर येथे गडाख यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी मुळा नदी पात्रात ठाण मांडले. पाणी सोडण्याच्या निर्णयाचा त्यांनी विरोध केला आहे.

श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे व राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी आंदोलकांना मुळा धरणाजवळ जाण्यास मज्जाव केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गडाख व पोलिसांनी चर्चा केल्यानंतर ठिय्या आंदोलन करत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची ग्वाही दिली.

तब्बल दोन तासांनंतर आंदोलकांनी मुळा धरणाच्या भिंतीलगत असलेल्या मुळा नदीच्या पात्राकडे आगेकूच केली. शेकडो पोलिसांच्या ताफ्यामध्ये हजारो आंदोलकांनी सत्ताधारी भाजप सरकारचा निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी गाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाला पाठिंबा दिला.

हजारो आंदोलकांनी मुळा धरणाच्या पायथ्याशी ठिय्या मांडल्यानंतर मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे, तहसीलदार अनिल दौंडे, वाकचौरे, उपअभियंता एन. बी. खेडकर, शिळीमकर, शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. शासकीय नियमांचे आम्हाला पालन करावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी आंदोलकाना सांगितले.

दरम्यान, अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने शासकीय अधिकाऱ्यांसह आंदोलकांची भंबेरी उडाली. भर पावसातही आंदोलक जायकवाडीला पाणी न सोडण्याच्या अटीवर ठाम होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)