भाजपकडून लाभार्थ्यांच्या घरी दिव्यांची रोषणाई

 ‘मी लाभार्थी’ ठरलेल्याच्या घरी जावून लावणार दिवे : कार्यकर्ते इलेक्‍शन मोडवर

कार्यकर्त्यांच्या घरांवर झेंडा

12 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत मेरा परिवार भाजपा परिवार ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपचे कार्यकर्त्यांना घराबाहेर भाजपचे स्टीकर लावण्याचे व घराच्या छतावर भाजपचा झेंडा लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात त्यादृष्टीने भाजप कार्यर्त्यांनी आपल्या घरावर झेंडे व स्टीकर लावून पक्षाच्या प्रचाराची मोहिम हाती घेतली आहे.

नगर – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे विविध मोहिमांच्या माध्यमातून अधिकृत प्रचारालाच सुरुवात झाली आहे. पुढील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निवडणुकांचे फटाके फुटायला वेळ असला तरी ऐन फेब्रुवारी महिन्यात भाजपकडून दिवाळीप्रमाणे बूथ पातळीवर जाऊन दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. कमल ज्योती संकल्प उत्सवाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या घरात दिवे लावण्यात येणार आहेत.

राज्याकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातीत “मी लाभार्थी’ प्रमाणे विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या येत्या 26 फेब्रुवारीला दिवे लावण्यात येणार आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या बुथप्रमुख, शक्‍तीकेंद्र प्रमुख व विस्तारक यांच्या बैठका घेवून कमल ज्योती अभियानाचे नियोजन करण्यात येत आहे. “मी लाभार्थी’ कुंडलीच बुथ प्रमुखांकडे देण्यात आली आहे. त्याचा घराचा पत्ता, मोबाईल नंबर आदी माहिती उपलब्ध करू देण्यात आली आहे. त्यामाध्यमातून आता बुथ प्रमुख थेट लाभार्थ्यांच्या घरी जावून शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या घरात दिवे लावणार आहेत.

बूथमधील पाच कार्यकर्त्यांकडून बाईकवर जनजागृती

याशिवाय 2 मार्च रोजी विधानसभा पातळीवर मोटरसायकल महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. भाज युवा मोर्चाकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक बूथमधून पाच कार्यकर्ते बाईक’ चालवतील व जनजागृती करतील.

यासंदर्भात पक्षातर्फे मंडळ, बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांना सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांच्या कालावधीत भाजपने पेजप्रमुख, बूथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख व विस्तारक यासारखे उपक्रम राबविले. या माध्यमातून थेट गावपातळीवर निवडणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जनतेमध्ये जाऊन सरकारी योजनांचा प्रचार-प्रसारदेखील झाला. मात्र आता यापुढे केंद्रपातळीवरुन आलेल्या सूचनांनुसार निवडणुकांच्या तोंडावर जनजागृती करण्यात येणार आहे. यात मेरा परिवार भाजपा परिवार’, महासंपर्क, कमल ज्योती व विजय संकल्प या मोहिमांचा समावेश आहे.

कमल ज्योती मोहिमेवर विशेष भर देण्याच्या सूचना आहेत. याअंतर्गत केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्यांच्या घरांमध्ये जाऊन 26 फेब्रुवारी रोजी दिवे लावण्यात येतील. विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी एकत्रित करण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. बूथ पातळीवर देखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपरोक्त कार्यक्रमासोबतच प्रत्येक बूथवर एका ठराविक वेळी नागरिकांना एकत्रित करुन कमीत कमी पाच दिवे लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)