एमआयडीसीची जलवाहिनी फुटली

मुळा धरणातून नगर एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने पिके वाहून गेली.

नांदगाव येथील शेतकऱ्यांचे नुकसान; शेतात पाणी घुसल्याने कांदा, ज्वारीची पिके गेली वाहून

नगर – मुळा धरणातून नगर एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नगर तालुक्‍यातील नांदगाव शिवारात आज (दि.18) पहाटे पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील अडीच एकर कांदा व ज्वारीचे उभे पीक अक्षरशः वाहून गेले आहे. ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे.

नगरच्या औद्योगिक वसाहतीला व औद्योगिक वसाहतीमार्फत अन्य ठिकाणी पाणीपुरवठा मुळा धरणातून केला जातो. त्यासाठी मुळानगर ते एमआयडीसी पर्यंत 700 एम. एम. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. ही जलवाहिनी अतिशय जुनी झाल्याने अनेकदा ती पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटण्याच्या घटना घडत आहेत. आज पहाटेच्या सुमारास ही जलवाहिनी नगर तालुक्‍यातील नांदगाव शिवारात पाण्याच्या व हवेच्या दाबाने तडा जाऊन फुटली.

त्यामुळे पाण्याचा लोंढा जवळच असलेल्या साहेबराव सोनवणे या शेतकऱ्याच्या शेतातून वाहू लागला. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने आणि मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने या शेतकऱ्याच्या शेतात लागवड केलेले कांद्याचे पीक वाहून गेले. तसेच कांद्याशेजारील शेतात असलेले ज्वारीचे उभे पीकही भुईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकरी साहेबराव सोनवणे यांचे ऐन दुष्काळी परिस्थितीत मोठे नुकसान झाले आहे.

जिल्हाभरात सध्या दुष्काळी परिस्थिती असताना एमआयडीसी प्रशासनाकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात चालढकल केली जात असल्याने वारंवार ती फुटत असून, पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. याबाबत माहिती मिळताच मांजरसुंबा गावचे सरपंच जालिंदर कदम यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

तसेच शेतकरी सोनवणे यांच्या शेतपिकाचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने त्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. तसेच एमआयडीसीचे अधिकारी नितीन हरिश्‍चंद्रे यांच्याशीही चर्चा करून नुकसान भरपाई तसेच जलवाहिनी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)