भीमा नदीपात्रात वाळुतस्करांची मुजोरी

अहोरात्र वाळूचा उपसा सुरू; महसूल प्रशासनाची डोळेझाक

अन्यथा आंदोलन…

भीमा नदीपात्रातून सर्रासपणे वाळू उपसा होत असताना प्रांताधिकारी, तहसीलदार हे महसूल विभागाचे अधिकारी व पोलीस निरीक्षक हे पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वाळू तस्करांची हिंमत वाढली आहे. महसूल व पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अवैध वाळू उपसाची दखल घेवून वाळू माफियांविरूध्द कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा कनरपडीचे माजी सरपंच सुनील काळे यांनी दिला आहे.

कर्जत – तालुक्‍यातील भीमा नदीपात्रातील वाळुचा लिलाव झाला नसतानाही नदीपात्रातून वाळू तस्कर अवैधरीत्या वाळू उपसा करीत आहेत. महसूल विभागासह पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे. दुष्काळाच्या भीषण परिस्थितीमध्ये वाळू उपसा रोखून नदीपात्रातील पाणी टिकवून ठेवण्याची गरज आहे. वाळू तस्करांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

-Ads-

खेड, भांबोरा, सिध्दटेक, औटेवाडी, बाभुळगांव, गणेशवाडी परिसरात चोरटी वाहतूक सुरू असतानाही त्यांच्यावर प्रशासकीय विभागांकडून कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन त्वरित वाळू तस्करांच्या मुसक्‍या आवळाव्यात अशी मागणी होत आहे. भीमा नदीच्या पात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळूचा छुप्या मार्गाने उपसा केला जात असल्याने नदीपात्रात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नदीकाठावरील गरीब शेतकऱ्यांची शेती पाण्याअभावी धोक्‍यात येत आहे.

मात्र विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल व पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई होत नसल्याने शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. मात्र या प्रकाराकडे प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोपही नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून होत आहेत.

खेड, शिंपोरा, बाभूळगाव, गणेशवाडी, भांबोरा, सिध्दटेक, जलालपूर आदी भागात भीमा पात्राचे वरदान आहे. मात्र या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रातील पाणी धारण क्षमता कमी होत आहे. परिसरातील विहिरींची पाणीपातळी प्रचंड खालावत आहे. विशेष म्हणजे तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत वाळुउपसा बंद करण्यात यावा असा ठराव घेतला आहे. तसेच वाळू उपसा करण्याचा लिलावही झालेला नाही. मात्र तरीही पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याने ग्रामस्थांकडून सोशल मीडियातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले जात आहेत.

तस्करांनी फोडली शासनाची बोट

आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाच्यावतीने सिद्धटेक येथे शासकीय बोट ठेवण्यात आली आहे. वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाच्यावतीने या गोष्टीचा वापर केला जातो. मात्र काही महिन्यांपूर्वी वाळूतस्करांनीच ही बोट फोडली असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली. या बोटीची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्यापही त्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे वाळू तस्करांवर नदीत जाऊन कारवाई करण्यासाठी मर्यादा येत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)