कर्जत – सिद्धटेक येथील भीमा पात्रात एका महिलेने उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सिद्धिविनायक देवस्थानच्या वाहनतळाजवळील भीमेच्या पात्रात दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बबई सुरवसे (वय-70), (रा. सौदे, ता. करमाळा) असे महिलेचे नाव आहे. मात्र हा प्रकार निदर्शनास आल्याने स्थानिक युवक आणि पोलीस पाटील यांच्या प्रयत्नाने या महिलेला पाण्याबाहेर काढून जीवदान दिले.
महिला नदीच्या पात्रात उडी घेत असल्याचे ग्रामपंचायतचे कर्मचारी विश्वनाथ भोसले, महादेव जगताप, पोलीस पाटील दादासाहेब भोसले यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ महिलेच्या दिशेने धाव घेत पाण्यात उडी मारून महिलेचा प्राण वाचवला. पोलीस पाटील दादासाहेब भोसले यांनी तात्काळ या घटनेची माहिती राशीन पोलीस ठाण्याला दिली. महिलेची कोणतीही तक्रार नसल्यास त्यांना नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचे पोलीस उपनिरीक्षकांनी सुचविले.
सदर महिलेला कर्मचारी व ग्रामस्थांनी विश्वासात घेऊन या घटनेबाबत विचारणा केली असता, कौटुंबिक कलहाचे कारण सांगितले. यावेळी महिलेने तिचा नातू संदेश कालीदास इंगळे (रा. चोंडी, ता. जामखेड) यांचा पत्ता सांगितला. उपस्थितांनी त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत त्याला सिद्धटेक येथे बोलावून घेत, महिलेला त्याच्या ताब्यात दिले. या सर्व प्रसंगाचे साक्षीदार असलेले सर्वच उपस्थित या घटनेने भावनाविवश झाले होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा