श्रीगोंद्यातील साखर कारखान्यांना ऊस टंचाई भेडसावणार

पावसाअभावी पाण्याचे दुर्भिक्ष्य : हुमणी प्रादुर्भावाने उत्पादनात घट

काष्टी – श्रीगोंदे तालुका ऊस उत्पादनाचे आगार म्हणून राज्यात ओळखला जातो. तालुक्‍यात दोन सहकारी व दोन खाजगी साखर कारखाने कार्यरत आहेत. तालुक्‍यातील चारही साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला. कारखान्यांची गाळपक्षमता व उपलब्ध उसाचे क्षेत्र पाहता श्रीगोंद्यातील साखर कारखान्यांना यंदाचे गळीत हंगामात ऊसटंचाईचा तीव्र प्रश्न भेडसावण्याची शक्‍यता आहे. पावसाअभावी पाण्याचे दुर्भिक्ष्य व हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने उसाचे एकरी उत्पादन कमालीचे घटले आहे. साखर उताराही घटण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

श्रीगोंदे तालुक्‍यातील शेती कुकडी व घोड धरणाचे पाटपाण्याने ओलीताखाली येते. भीमानदी व घोड नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्याचे उद्‌भवातून उपसा जलसिंचन योजना राबवून पाईपलाईनने शेती भिजते. श्रीगोंदे तालुका 72 टक्के बागायती म्हणून राज्यात परिचित आहे. बागायती भागात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. यंदा मात्र भर पावसाळ्यात पाऊस झालाच नाही. हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढला. ऊस शेतातच जळून गेला. जनावरांचे चारा म्हणून ऊसतोड झाली.

गुळ उद्योगासाठी ऊस गाळप झाले. आता नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरु झाले आहेत. नागवडे (श्रीगोंदे) व कुकडी हे दोन सहकारी तसेच साईकृपा देवदैठण व हिरडगाव हे दोन खाजगी असे एकूण चार साखर कारखान्यांचा गाळप हंगाम यशस्वीपणे सुरु झाला आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने साखर कारखान्यावर ऊसतोडणी मजूर दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक आले आहेत.

श्रीगोंदे तालुक्‍यातील चारही साखर कारखाने दैनंदिन गाळप चांगले पध्दतीने करीत आहेत. पुणे व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने श्रीगोंदे तालुक्‍यातून ऊस गाळपासाठी नेत आहेत. कारखान्यांची गाळपक्षमता विचारात घेता, उपलब्ध उसाचे क्षेत्रात ऊस टंचाईचा प्रश्न साखर कारखान्यांना भेडसावणार आहे.

पावसाअभावी पाणीटंचाई व उन्हाळ्यातील पाणी संकट लक्षात घेऊन यंदा ऊस लागवड अल्प प्रमाणात झाली. ऊस लागवड कमी झाल्याने शेतकरी खोडवा राखतील अशी आशा होती. मात्र, खोडवा ऊस पिकाला हुमणी अळीचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकरी खोडवा राखण्यापेक्षा कांदा, गहू, हरभरा पिकाकडे वळाले आहेत. त्यामुळे आगामी वर्षात साखर कारखाण्यांना ऊस टंचाई आणखी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. शेतकरी, ऊसउत्पादक, साखर कारखानदारी पावसाअभावी ऊसटंचाईच्या संकटात सापडली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)