टंचाई काळात जखणगावात होतोय अवैध पाणीउपसा

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर प्रशासकीय पातळीवर फक्त कागदोपत्री कार्यवाही

-प्रदीप पेंढारे

नगर – जखणगावतील (ता. नगर) खासगी विहीर व विंधनविहिरीतून होत असलेला अवैध पाणी उपसा थांबविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहे. जिल्हा प्रशासनाकडे दाखल तक्रारीवर प्रत्यक्ष कारवाई होण्याऐवजी त्यावर कागदोपत्री कार्यवाही सुरू आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीला ग्रामस्थ वैतागले आहेत. जखणगावात पाणीटंचाई झाल्यास त्याला सर्वथा प्रशासनाच जबाबदार राहील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तक्रारीची योग्य दखल न घेतल्यास वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, अशी भूमिका उपसरपंच मुजीब शेख यांनी मांडली आहे.

नगर तालुक्‍यातील 94 गावे टंचाईसदृश म्हणून जाहीर प्रशासनाने जाहीर केली आहेत. या टंचाईसदृश गावांमध्ये जून 2019 पर्यंत सर्व स्त्रोतामधील पाणी उपशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यात जखणगावाचा देखील समावेश आहे. असे असताना गावातील खासगी विंधनविहिरीतून मध्यरात्रीनंतर मोठ्याप्रमाणात पाणी उपसा सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. भूगर्भातील पाणीसाठाच या परिस्थिती जखणगावला वाचू शकतो. खासगी विंधनविहिरीतून पाणी उपसा सुरू राहिल्यास डिसेंबरअखेरलाच जखणगावाला पाणीटंचाई जाणवले. पाण्यासाठी लोक रस्त्यावर येतील. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने गावातील खासगी विंधनविहिरीवरील पाणी उपशावर लक्ष ठेवावे. अवैध पाणी उपशावर कारवाई करावी. सार्वजनिक हित जोपासावे. या तक्रारीमागे हीच अपेक्षा आहे.
– गनी पटेल, अध्यक्ष, राष्ट्रसेवा सामाजिक प्रतिष्ठान, जखणगाव

ग्रामस्थांनी ही तक्रार सुरूवातीला ग्रामपंचायतीकडे केली. त्यानुसार ग्रामसेवक यांनी संबंधितांना टंचाईसदृश परिस्थितीमुळे विंधनविहिरीतील पाणी शेती किंवा व्यवसायासाठी वापरता येणार नाही. त्यामुळे विंधनविहिरीतील पाणीउपसा त्वरीत बंद करावा. पाणी उपसा आढळल्यास विंधनविहीर सील करण्यात येईल, असा आदेश बजावला होता. यावर देखील संबंधितांनी पाणीउपसा सुरूच ठेवला.

ग्रामस्थांनी यावर ही तक्रार तहसीलदार, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे केली. तहसीलदारांनी गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागालाही कारवाईच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने यावर पाहणी करत फक्त समज देण्याचे काम केले. यावरही संबंधितांना फरक पडला नाही. विंधनविहिरीतून पाणी उपसा सुरूच ठेवला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास डिसेंबरअखेरलाच जखणगावला पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

-जखणगावची परिस्थिती
– निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त
– आरोग्यग्रामचा पॅर्टन
– तीन हजार लोकसंख्या
– सहा सार्वजनिक विंधनविहिरी
– 50 ते 60 खासगी विंधनविहिरी
– 30 ते 50 शेततळी
– बुऱ्हाणनगर पाणी योजना नसल्यासारखी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)