मायलेकाच्या जिद्दीपुढे नियतीनेही टेकले हात!

-बाबासाहेब गर्जे

पाथर्डी  : चाळीस-बेचाळीशीचा, दोन्हीही पायांनी अपंग, त्यांची तीनचाकी सायकल ढकलणारी पंच्याऐंशी वर्षांची वृद्ध आई, कधीच लपवता येणार नाहीत, असे दुःख उराशी बांधून नैराश्‍येच्या झळांनी करपलेली भावमुद्रा. अवघ्या विश्‍वातील दारिद्री जणू दोघाही माय-लेकासाठीच, भरल्यापोटीचा ढेकर म्हणजे दोघांसाठीही कधीकाळी पडलेले जणू स्वप्नच. सुख, समाधान, आनंद, हासू ही फक्त नावे ऐकून असलेली व दुःख आणि दुःखच भोगण्यासाठी जन्मलेली ही मायलेकाची जोडी शहरातील रस्त्यांवर भीक मागून जीवन जगत आहेत. पण जगण्याची जिद्द चिकाटीने त्यांच्यापासून मृत्यू देखील दूर पळत आहे. या मायलेकाला दररोज पाथर्डीकर पाहत असून त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी दान करून सलाम करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तरुण मुलाचे पाय बनून सायकल लोटणाऱ्या वृद्ध माऊलीची कर्मकहाणी ऐकल्यानंतर आई मायेचा सागरच असते, या कवितेचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो. दोन्हीही पायांनी अपंग रामा गणपत काळोखे तीनचाकी सायकलवर बसलेला. त्याची 85 वर्षे वयाची आई शांताबाई गणपत काळोखे सायकल लोटत असते. दिवसभर 15 ते 20 किलोमीटर सायकल लोटून ही माय असाह्य लेकराचा अपंग संसार गेली अनेक वर्षे ओढत आहे. न थकता न थांबता त्याला घेऊन पोटाची खळगे भरण्यासाठी दारोदारी भीक मागते आहे. घर-दार, सगे-सोयरे, सुख, संसार, आनंद, मान, अपमान, स्वाभिमान धन, दौलत या गोष्टी दोघांसाठी कधीच नाहिशा झालेल्या आहेत.

जिवंत आहे म्हणून जगले पाहिजे, फक्त एवढाच आशावाद घेऊन त्यांच्यासाठी नवीन दिवसाचा सूर्योदय होतो. यापेक्षा जगण्यासाठीचे वेगळे कारण कितीही शोधले तरी सापडणार नाही. तरीही अपंग मुलाच्या भविष्यासाठीची धडपडत करताना या वयातही शांताबाईंचा धीर खचलेला नाही. स्वाभिमानी रक्त आज ही कधी कधी गुणधर्माला जागते. शांताबाई कुणापुढेही हात पसरत नाहीत. ज्याला दया येते ते देतात. हा काय रोजचाच ताप असे म्हणून काही जण पुढे जातात.

पालथ नशीब घेऊन जन्माला आले भाऊ, बापाची लाडकी लेक मी, मुलीचं ओझं डोक्‍यावरून खांद्यावर घ्यायचं हा व्यवहार पाहून बापान्‌ बाराव्या वर्षीच थाटात लग्न लावलं. नवरा दारुडा निघाला अन्‌ संसाराची राखरांगोळी झाली. दिवसेंदिवस वय वाढत चाललंय, वयामानाने हात-पाय दुखतात, शरीर केव्हाच थांबलंय, फक्त परिस्थिती त्याला थांबू देत नाही. अंगात शक्‍ती नसल्याने आता सायकलही लोटवत नाही. मी मेल्यानंतर याच कसं होईल? हे सांगत असताना अनंत जन्माचे दुःखच जणू शांताबाईंच्या डोळ्यातून ओघळत होते.

नागझरीच्या आढागळे पाटलाची शांताबाई ही लाडकी लेक पाथर्डीच्या काळोख्यांची सून झाली. नवरा दारुडा निघाला. त्यात एकामागून एक पाच मुले झाली. तीन मुले उपचाराविना दगावली. पाच महिन्यांचा असतानाच रामालाही पोलिओ झाला. तेव्हापासून शांताबाईच रामाचे पाय बनून जगत आहेत. नवऱ्याचा मृत्यू झाला. जन्मापासूनच रामाला शांताबाई लहान मुलासारखे सांभाळत आहेत. सायकल ढकलणे एवढेच त्यांच्या हातात. दिवसभरात वीस ते 50 रुपये भिक्षा मिळते. कसबा पेठेतील राहते घर जीर्ण झाले आहे. ते धोकेदायक बनल्याने शांताबाई मुलाला घेऊन नवीन बस स्टॅंडवर झोपतात.

दोघांना मिळून हजार रुपयांचा शासकीय डोल मिळतो. तोही वेळेवर नाही. शासनाने अपंगांना मोफत सायकलीची घोषणा केली. मात्र शहरातील लोकांना मिळत नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनेक दलालांनी पैसे घेतले. मात्र सायकल मिळाली नाही. अखेर रामाला लागणारी सायकल त्यांनी पदर पैशातून विकत घेतली. शासनाने घरकुलाची घोषणा केली. पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर घरकुल मंजूर झाले. अगोदर बांधकाम करा नंतर पैसे देऊ, अशी प्रशासनाने भूमिका घेतल्याने शांताबाई अडचणीत आल्या.

माझ्या मृत्यूनंतर माझ्या अपंग मुलाची काळजी कोण घेणार, हा प्रश्न त्यांना सारखा भेडसावतो आहे. याची कायमस्वरूपी डोळ्यादेखत व्यवस्था व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. नेतेमंडळी निवडणूक काळात विचारपूस करतात त्यानंतर आमच्याकडे कोणीही ढुंकून पाहात नाही. अपंग मुलाची एखाद्या सेवाभावी संस्थेत राहण्याची व्यवस्था व्हावी, फक्त एवढीच माफक अपेक्षा त्यांनी अनेकदा व्यक्‍त केली.

दिवसेंदिवस वय वाढत चालल्याने शांताबाईंना रामाला घेऊन सायकल ढकलने अशक्‍य होत चालले आहे. रामाच्याही अवयवांच्या हालचाली दिवसेंदिवस रोडावत चालल्याने येणारा प्रत्येक दिवस अधिक दुःख व दारिद्रय घेऊन येतो आहे.

दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सुख येईल, या मराठी गीतांच्या ओळी प्रत्येक दुःखी माणसाच्या जीवनात सुखाची आस निर्माण करतात. मात्र या मायलेकरांसाठी या ओळी अर्थहीन बनल्या आहेत.

सुख घेऊन येणारा सूर्य त्यांच्यासाठी कायमचाच मावळलेला आहे. आशेचा किरण त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष देव सुद्धा आणू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या वृद्ध मातेला मदत करून तिच्या मुलाची जबाबदारी घेऊन तिची चिंता दूर करण्यासाठी कोणी पुढाकार घेईल काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)