बसच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालक रस्त्यावर

कोळवडीत दोन तास रास्तारोको; प्रवाशांचा खोळंबा

कर्जत – तालुक्‍यातील कोळवडी येथील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी नियमित एसटी बसच्या सुरू करण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी दहा वाजता कोळवडीत रास्तारोको आंदोलन केले. हे आंदोलन दोन तास चालले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोळवडी येथून कर्जतला मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र कोळवडी हे गाव कर्जतपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असल्याने येथे अनेक एसटी बस थांबत नाहीत. राशीन तसेच कर्जतला जाण्यासाठी कोळवडी येथील बस थांब्यावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशी असतात. मात्र बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही. तसेच इतर प्रवाशांची नियमित अडचण होते. बसच्या अभावामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

या आंदोलनात कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके, कर्जत तालुका तालीम संघाचे अध्यक्ष प्रविण घुले, भाजपाचे अशोक खेडकर, मनसेचे सचिन पोटरे आदी राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला. याच मागणीसाठी यापुर्वी दोन वेळा आंदोलने झाली आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या कारभारात कसलीही सुधारणा झाली नाही. वेळोवेळी लेखी पत्र देऊनही परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभारात सुधारणा झाली नाही. विद्यार्थी नियमित वेळेत पोहोचू शकत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे पालक हे या प्रश्नावर संतप्त झाले होते.

कोळवडी येथून एसटी बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना कर्जत किंवा राशीनचे तिकीट काढण्याची सक्ती वाहकांकडून केली जात होती. या सर्व प्रकारांवर आंदोलनकर्त्यांनी आक्षेप घेत संतप्त भावना व्यक्त केल्या. श्रीगोंदे तसेच जामखेड आगाराच्या कारभाराचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला.

आंदोलनामध्ये राहुल नवले, सुनील क्षीरसागर, पांडूरंग दवणे, धनराज कवडे, पांडूरंग डमरे, धनराज थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. तारकपूर आगाराचे चालक व वाहक कोळवडीत नियमितपणे बस थांबवून सहकार्य करतात. त्यांच्याकडून आम्हाला चांगली वागणूक व सहकार्य मिळते अशी माहिती विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान दिली. त्यामुळे या आगाराच्या चालक व वाहकांच्या आभाराचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.

बस नियमित थांबतील

कोळवडी येथील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र एसटी बस उपलब्ध करून देण्यात येईल, असे श्रीगोंदे आगारप्रमुखांनी लेखी आश्वासन दिले. कर्जतचे स्थानकप्रमुख बाळासाहेब मराळ यांनी जामखेड आणि श्रीगोंदे आगाराच्या गाड्या येथे नियमित थांबविण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आले. जामखेड आगाराचे आगारप्रमुख मात्र आंदोलनाकडे फिरकले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)