हमाल, मापाडी, शेतकरी सरकारविरोधात एकत्र

डॉ. बाबा आढाव यांची माहिती : नगरला असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा मेळावा

नगर – सरकारच्या नवीन माथाडी कायद्यावरची टांगती तलवार व रोज वाढणारी महागाई यामुळे हातावर पोट असणाऱ्या आपल्या कोट्यवधी असंघटीत कष्टकऱ्यांचे जगणे मुश्‍किल झाले आहे. आता शेतकऱ्यांनाही आपल्या बरोबर घेत आहोत. आपल्या कष्टाची जशी चोरी केली जाते, तसे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव सरकार ठरवते; पण हा ठरविलेला हमी भाव देत नाही. त्यामुळेच हमाल-मापाडी-शेतकऱ्यांनी एकत्रितपणे या सरकारविरोधात लढा देण्याची गरज आहे, असे मत राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर जिल्ह्यातील सर्व हमाल, मापाडी, माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. आढाव बोलत होते. या वेळी हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, सल्लागार माजी आ.दादाभाऊ कळमकर, बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक संदीप कर्डिले, महामंडळाचे राजकुमार घायाळ, विकास मगदूम, सुभाष लोमटे, नवनाथ बिनवडे, बाबा आरगडे, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, शेख रज्जाक शेखलाल, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पोपटलाल बोथरा, शांतिलाल गांधी, गोपाल मणियार आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, की जसा रोजगार हमीचा कायदा देशभर पसरला, तसा माथाडी कायदा देशभर लागू करावयाचा आहे. कष्टकऱ्यांचा जाहीरनामा जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू. आता सर्वांनी एकत्र येऊन कठीण परिस्थितीचा सामना केला पाहिजे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील हमाल-मापाड्यांचे मेळावे घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येत आहेय नगरच्या रिक्षा चालकांच्या प्रश्नात आपण लक्ष घालणार आहोत.

कळमकर म्हणाले, की सरकारने सर्वच क्षेत्रातील लोकांना जेरीस आणाले आहे. त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. हमाल-मापाडी यांचे हक्क हिरावून घेण्याचे काम सध्याचे सरकार करत आहेत. सरकारच्या या कृतीविरोधात आता एकत्रितपणे आवाज उठविला पाहिजे. कामगार विरोधी धोरणांना विरोध करून आपण आपले हक्क मिळविण्यासाठी एकत्रित लढा देण्याचे काम सर्वांनी करावे.

घुले म्हणाले, की माथाडी कायद्याची अंमलबजावणी व्हावी, पेन्शन मिळावी, मोलकरणींना माथडी कायदा लागू करावा, असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी समाजिक सुरक्षा योजना लागू करण्यात यावी, मोफत घरे आदी मागण्या सरकारने केल्या आहेत. या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे. प्रसंगी तीव्र स्वरुपाचे आंदोलन राज्यभर करण्यात येईल.

सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांनी या वेळी सरकारच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. असंघटीत कामगारांची नोंदणी करून घेऊन त्यांना ओळखपत्र देण्याचे काम सुरू आहे. पुढील काळात डिजिटायलेझनच्या माध्यमातून त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

या वेळी महामंडळाचे हरीश मगदूम (सांगली), नवनाथ बिनवडे (पुणे), सुभाष लोमटे (औरंगाबाद), राजकुमार घायाळ (बीड) आदींची या वेळी भाषणे झाली. या वेळी हमाल-मापाड्यांना प्रातिनिधीक स्वरुपात बोसनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ हमाल किसन नवले, महादेव बडे, सुमनबाई गायकवाड यांचा डॉ. आढाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्धव काळापहाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मधुकर केकाण यांनी आभार मानले. मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व हमाल-मापाडी, माथडी, शेतकरी, इमारत बांधकाम कामगार, काच-पत्र गोळा करणारे व असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)