पाणीप्रश्‍नी आ. वैभव पिचड कधी राजीनामा देणार ?

तालुका भाजपचा सवाल : समन्यायी पाणी पाटप कायदा कोणी केला, याची करून दिली आठवण

अकोले – अकोले तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी निळवंडेतून एक थेंबही जाऊ देणार नाही, असे वक्तव्य आमदार वैभवराव पिचड यांनी पक्षीय मोर्चात केले होते. या मताशी आमचा पक्ष सहमत आहे. त्यामुळे आ. पिचड कधी राजीनामा देणार, समन्यायी पाणी वाटप कायदा कोणी केला, असा खोचक सवाल करून हे आघाडी सरकारचेच पाप असल्याची टीका केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पत्रकात म्हटले आहे की, अकोले तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती असून, आढळा धरण भरले नाही. त्यात ‘समन्यायी पाणी वाटप’ कायद्यानुसार मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. समन्यायी पाणी वाटप कायदा हे पाप आहे. हे पाप आमदार वैभव पिचड यांचे वडील तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांचे आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

तेव्हा मराठवाड्याचा कळवळा असणाऱ्या माजी मंत्री पिचड यांना तालुक्‍यातील आढळा भाग दिसला नाही का, असा गंभीर आरोप करून, आम्ही समान पाणी वाटप कायद्याला विरोध केला होता, याची आठवणही करून दिली आहे. त्यावेळी ‘मराठवाडा पाकिस्तानात आहे काय,’ अशी आमची टिंगल केली होती. त्यावेळी आढळा भाग अकोले तालुक्‍याच्या बाहेर होता काय? या पाणी वाटपावर सही करण्यापूर्वी आढळा धरण भरले नाही, तर प्रवरेतून एक टीएमसी पाणी मिळण्याचा हक्क का ठेवला नाही? असे प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार समन्यायी पाणी वाटप कायदा करण्यात आला आहे, याची आठवण करून देत, त्यानुसार प्रत्येक धरणात पावसाळा संपल्यावर किती पाणीसाठा असावा, याचा निर्णय घेण्यात येत आहे. 2011-12 ला मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी पहिल्यांदा समन्यायी पाणी वाटप प्रश्‍न ऐरणीवर आला आणि वाद सुरू झाला, असे पत्रकात नमूद केले आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणामध्ये भंडारदरा-निळवंडे धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. मग आता आमदार वैभव पिचड राजीनामा देणार काय, अशी विचारणा पक्षाचे जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, माणिक देशमुख, भाऊसाहेब काका वाकचौरे, सुभाष वाकचौरे, सूर्यभान दातीर, भाऊसाहेब आभाळे, डॉ रवींद्र गोर्डे, ईश्वर वाकचौरे, प्रभाकर वाकचौरे, कारभारी वाकचौरे, लताताई देशमुख, शिवाजी पारासूर, श्रीकांत भुजबळ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)