प्रलोभनांवर प्रशासकीय अंकुशासाठी 23 भरारी पथके

जिल्हाधिकारी द्विवेदी यांची माहिती : निवडणुकीचा प्रचार थांबताच प्रशासन वेगाने सक्रिय

नगर – महापालिका निवडणुकीसाठी प्रचार सांगता आज शुक्रवारी सायंकाळी झाली. निवडणुकीनंतरच खरा प्रचार सुरू होतो. तो म्हणजे छुपा प्रचार! या प्रचाराद्वारे मतदारांना प्रलोभने दिले जाऊ शकते. याला अटकाव करता यावा यासाठी प्रशासनाने प्रभाग निहाय भरारी पथके नियुक्ती केली आहे. पहिले सात आणि आता 17, अशी एकूण 23 भरारी पथक मतदान होईपर्यंत शहरात गस्त घालून कारवाई करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, “या पथकांचे एकच काम राहणार आहे. शहरात आणि शहरालगत कुठे संशयास्पद हालचाली असतील त्यावर कारवाई करायची. मतदारांना प्रलोभन दिले जात असले, तर तिथेही हे पथक थेट फौजदारी कारवाई करेल. नागरिकांना तक्रारीसाठी जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्वतःचा भ्रमणध्वनी (7758060609) जाहीर केला. हा भ्रमणध्वनी निवडणुकीपर्यंतच कार्यरत राहणार आहे.

‘ गेल्या पंचवार्षिकला 27 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन प्रबोधन करत आहेत. नागरिकांकडून देखील त्याला प्रतिसाद मिळत आहे. प्रचार संपला आहे. त्यामुळे प्रचारासाठी वापरलेली फलके, झेंडे पक्षांनी स्वतःहून काढून घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या गेल्याची द्विवेदी यांनी सांगितले.

याद्यांतील दुबार आणि मयत मतदारांच्या घोळावर उपजिल्हाधिकारी आनंदकर म्हणाले, “महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर मयत मतदाराच्या यादीची जबाबदारी सोपावली होती. त्यानुसार मतदार यादीमध्ये 3 हजार 800 मतदार मयत आढळले आहे. दुबार मतदार म्हणून 1100 मतदार आढळून आले आहेत. याबाबत स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या आहेत.’ प्रभागनिहाय प्रत्येक अधिकारी आणि मतदान केंद्रावर या याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी पुलिंग एजंटची जबाबदारी वाढते. कोणी दुबार मतदान करत असेल, पुलिंग एजंट यांनी तत्काळ हरकत नोंदवावी. पुढील कारवाई तेथील प्रशासकीय अधिकारी करतील, असे त्यांनी सांगितले.

पतसंस्था आणि खासगी बॅंकाना नोटिसा

उमेदवारांची बॅंक खात्यावरील आर्थिक व्यवहाराचा तपशील देण्यास काही पतसंस्था आणि खाजगी बॅंका टाळाटाळ करत आहेत. ही माहिती न देणाऱ्या पतसंस्था आणि बॅंकांच्या व्यवस्थापकांवर कारवाईचे संकेत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी दिले आहे. या पतसंस्था आणि बॅंकेच्या व्यवस्थापकांना नोटिसा बजविण्याचा काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

खर्चाबाबत उमेदवारांवर निवडणुकीनंतर कारवाई

निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार “ऍप’वर किरकोळ स्वरुपात खर्चाची माहिती देत आहेत. यामुळे निवडणूक आयोगाचे समाधान होत नाही. खर्चाची माहिती दैनंदिन देऊन त्याचा तपशील देणे गरजेचे आहे. अनेक उमेदवारांकडून तसे न झाल्याने निवडणुकीनंतर या उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)