मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नगर – मुस्लीम सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने संस्थापक अध्यक्ष आबीद हुसेन यांच्या नेतृत्वाखाली बाबरी मशीद पुन्हा त्या जागेवर उभारावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत गृहखात्याचे प्रमुख यांना देण्यात आले. यावेळी आबीद हुसेन, अजहर काझी, अक्रम बागवान, असिफ रजा, अन्वर पटेल, मोहंमद सौदागर, नईम सरदार, सरफराज जहागिरदार, मतीन खान, जहीर काझी, वसीम शेख, जावेद खान, नाजीम शेख आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 6 डिसेंबर 1992 ला जातीयवादी शक्तींनी भारतीय संविधानाला चिरडून लोकशाहीचा खून केला, तसेच न्याय व्यवस्थेचे चिंधड्या उडवून अक्षरश: पुरातन ऐतिहासिक बाबरी मस्जिद उध्वस्त करुन देशाच्या संविधानाची खिल्ली उडवून समस्त जगाच्या मुस्लिमांची व धर्मनिरपेक्ष जनतेची धार्मिक व सामाजिक भावना दुखावली त्याला आज 26 वर्षे पूर्ण होत असून, आम्ही नगरचे मुस्लिम समाजबांधव त्या वेळेस केंद्रात सत्तेत असलेल्या कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा व कट्टरवादी संघटनांचा तीव्र जाहीर धिक्कार व निषेध करीत आहोत.
त्यावेळेस केंद्रात सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने त्यावेळी देशाच्या मुस्लिमांना आश्वासन दिले होते की, बाबरी मस्ज़द पुन्हा त्याच जागेवर उभारण्यात येईल, परंतु आज 26 वर्षे झाले तरी त्यांना त्या आश्वासनांचा विसर पडला आहे. मात्र नेहमी भाजपाचा धाक दाखवून मुस्लिमांच्या मतांवर डोळा ठेवणे त्यांनी सोडले नाही.
भाजपा-सेना तर मुस्लिमांचे उघड शत्रूच आहेत. त्यांनी तर भारताच्या न्याय व्यवस्थेची पूर्ण चेष्टा लावली असून, अशा राजकीय पक्ष ज्यांच्यामुळे समस्त भारताचे नुकसान होत आहे, आता भारतीय जनतेने अशा दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व हिंदू-मुस्लिम समाजात जातिय दंगली भडकावणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करुन बाबरी मशीद पुन्हा त्याच जागेवर उभारण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा. त्याचबरोबर राष्ट्रपतींकडेही बाबरी मस्ज़द पुन्हा त्याच जागेवर उभारावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा