ऊसतोड कामगारांची मुले अद्यापही शाळेपासून दूर

सर्वशिक्षा अभियान राबवूनही राज्यातील लाखो मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरच


-गणेश घाडगे

-Ads-

नेवासे – एकही मूल शाळाबाह्य राहू नये, म्हणून 2009 मध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा राज्य शासनाने पारित केला. या कायद्यानुसार कुठल्याही मुलाला शाळेत प्रवेश देणे सक्तीचे आहे. परंतु आजही राज्यातील लाखो मुले शाळेच्या प्रवाहाबाहेर आहेत. त्यात ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचाही समावेश आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील 12 ते 14 लाख ऊसतोडणी मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यांत ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होत असतात. या कुटुंबांसोबत त्यांची मुलेही नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात येतात. मात्र ऑक्‍टोबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या साखर हंगामात या मुलांचे शिक्षण बंद असते. या मुलांना शाळेत आणण्याचे किंवा त्यांना शिक्षण देण्याची कोणतीही ठोस योजना सध्या नेवासे तालुक्‍यातील चित्रावरून दिसत नाही.

नेवासे तालुक्‍यात मुळा व ज्ञानेश्वर ही दोन सहकार साखर कारखाने व इतर कारखान्यांच्या ऊसतोडणी टोळ्या देखील दाखल झाल्या आहेत. या कारखान्यांसाठी ऊसतोडणीसाठी हजारो मजूर काम करतात. पण त्यांच्याबरोबर असलेली मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत.

आई-वडिलांना मुलांना शिकवायचे आहे. पण शिक्षणासाठी कोणतीच योजना अथवा सोय या ठिकाणी नसल्याने मोठे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. त्यांची मुले ही त्यांच्याबरोबर ऊस तोडताना उसाच्या शेतातच असतात. या मुलांनाही शिकायचे आहे. परंतु या ठिकाणी आल्यावर शिक्षणच मिळत नसल्याने त्यांची स्वप्ने भंगताहेत. या मुलांसाठी साखर शाळा व त्यानंतर निवासी हंगामी वसतिगृह, अशा अनेक योजना तत्कालीन सरकार व विद्यमान सरकारने राबविल्या. पण त्या कधीच यशस्वी होऊ शकल्या नाहीत. आजही लाखो मुले सरकारी अनास्थेमुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत.

“ऊसतोडणी, वीटभट्टी, राजस्थानी गुरखी व अन्य भटक्‍या कुटुंबांचे सर्वेक्षण तालुक्‍यात करण्यात आले. त्यात आतापर्यंत 89 मुले शाळाबाह्य आढळून आली. मागील वर्षी 119 मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणली होती. 89 मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश दिला आहे. राजस्थानी गुरख्यांच्या 19 मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला. उत्तर प्रदेशातील वडाळा परिसरात राहणाऱ्या 7 मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले असून, यासाठी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांनी सहकार्य केले. शालाबाह्य मुले आढळल्यास त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे.                                   -विलास साठे, गट शिक्षण अधिकारी,नेवासे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)