पाथर्डीतील दुष्काळी स्थिती पाहून केंद्रीय पथक निःशब्द

केंद्रीय दुष्काळी पथकाकडून पाहणी; सरकार जनतेच्या मागे – ना. शिंदे

प्रसंगी रेल्वेने चारा आणू

केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने ना. शिंदे व आ. राजळे हे सुमारे अडीच तास समितीची वाट पहात शासकीय विश्रामगृहावर थांबले. यावेळी अनौपचारिक बोलतांना ना. शिंदे म्हणाले, केंद्र सरकारच्या तरतुदीनुसार चारा छावण्या राज्यात सुरु कराव्या लागतील. सर्रासपणे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर पैसे देणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाने शक्‍य होणार नाही. मागणी आराखडा केंद्राकडून मंजुर होताच सर्व उपाय योजना सुरु केल्या जातील. छावणी चालकाकडून कुठेही गैरव्यवहार होणार नाही. यासाठी कडक उपाय योजना केल्या जातील. जिल्ह्यात चारा कमी पडल्यास रेल्वेने चारा उपलब्ध करु.

पाथर्डी – केंद्रीय पथक दुष्काळी पहाणी समितीकडून आज तालुक्‍यातील शिरसाठवाडी, रांजणी व केळवंडी या गावाचा पहाणी दौरा केला. जळालेले कांदे, कपाशी, शिरसाटवाडीचा कोरडा पडलेला पाझर तलाव, नापेर शेती, टॅंकरद्वारे होत असलेला पाणीपुरवठा असे विदारक चित्र पाहुन केंद्रीय समितीचे सदस्य नि:शब्द झाले.

राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या मागणीला केंद सरकारने सकारात्मकता दाखवत केंद्रीय समितीला राज्यात पाठवले असल्याने केंद्राकडून लवकरच निधी प्राप्त होवून जिल्ह्यात सर्व प्रकारच्या दुष्काळी उपाययोजना केल्या जातील. जनतेच्या मागे राज्य व केंद्र सरकार भक्कमपणे उभे राहील असा विश्वास पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सात हजार कोटी रुपयाचा प्रस्ताव दुष्काळ निवारणासाठी पाठवल्यानंतर आज केंद्रीय पथकाने संपूर्ण राज्यात दुष्काळी पाहाणी दौरा केला.पाथर्डीत आलेल्या पथकात सह संचालक सुभाषचंद्र मिना, वरिष्ठ उपसंचालक एम.जी. टेंभुर्णे, कृषीतज्ज्ञ विजय ठाकरे यांचा समावेश होता. पालकमंत्री प्रा.राम शिंदे, आ. मोनिका राजळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, प्रातांधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, माजी जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर, अर्जुन शिरसाठ, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रविण राजगुरू, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर आदि सहभागी झाले होते.

पाथर्डी येथे 3 वाजण्याच्या सुमारास पथक दाखल झाले. त्यानंतर शिरसाठवाडी येथील पूर्णपणे पाण्याअभावी कोरडा पडलेला तलाव पाहिला. यावेळी उपस्थितांनी सांगितले की, 1972 नंतर पहिल्यांदा हा तलाव कोरडा पडला आहे. भीषण अशी पाणीटंचाई यावर्षी निर्माण झाली आहे. तलाव आटल्याने शेकडो एकर क्षेत्रावरील पिके जळाली आहेत. त्यांनतर रांजणी येथील नापेर झालेली शेती, उजाड झालेले डोंगर, जळालेल्या फळबागा, टॅंकरद्वारे होत असलेला पाणीपुरवठा पाहिला. रांजणी येथे चतुराबाई घोडके व प्रभुनाथ घोडके यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

संजय सोनवणे या शेतकऱ्यांचा दोन एकर कपाशीचा प्लॉट पाहून केंद्रीय समितीकडून देखील अस्थेने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची साधने, मुलांचे शिक्षण, मिळत असलेले उत्पन्न याची माहिती घेतली. कपाशीचे उत्पन्न पावसाअभावी सात ते आठ टक्‍केवर आल्याने तालुक्‍यातील लोकांना उसतोडणीसाठी साखर कारखान्यावर स्थलांतरीत व्हावे लागले असल्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी केंद्रीय समितीच्या निदर्शनास आणून दिले.

केळवंडी येथील रामदास कोठे यांचे जळालेले कांदा पिकाची पहाणी केली. नगरपालिका हद्दीत दुष्काळी कामे सुरु व्हावीत, छावण्या सुर व्हाव्यात, रोजगार हमी योजनेची कामे व्हावीत, पालिका हद्दीतील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे अशा मागणीचे निवेदन बांधकाम समितीचे सभापती रमेश गोरे, रामनाथ बंग, सभापती दिपाली बंग, नामदेव लबडे, अनिल बोरुडे यांनी दिले. तर पंचायत समितीच्या वतीने रोहयोचे नियम शिथील करावेत अशा आशयाचे निवेदन उपसभापती विष्णूपंत अकोलकर, गोकुळ दौंड, पं.स. सदस्य सुनिल ओव्हळ, सुभाष केकाण यांनी दिले.

केंद्रीय समितीचे समन्वयक अधिकारी म्हणून शिर्डीचे उपजिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुनिल तुभांरे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)