प्रस्तावित सुरत-हैद्राबाद महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध

नगर : सुरत ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाला मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी परिसरात शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून निदर्शने केली. (छाया - लहू दळवी)

केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे सर्वेक्षण सुरू : जिल्ह्यातून 100 किमीचा रस्ता

गडकरींना शनिवारी भेटणार- आ. कर्डिले

सुरत ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हेक्षणास नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्यामुळे याची माहिती मिळताच या प्रकल्पाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी संबंधित विभागाचे अधिकारी आणि नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची संयुक्त बैठक नगर बाजार समितीतील शेतकरी निवास सभागृहात बुधवारी दुपारी घेतली. या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण व शेतकरी उपस्थित होते. आ. कर्डिले म्हणाले की, नगर तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्याची सुपीक, बागायती जमीन या प्रकल्पासाठी जावू देणार नाही. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे शनिवारी नगर दौऱ्यावर आल्यावर त्यांची नगर, राहुरी व पाथर्डी तालुक्‍यातील शेतकऱ्यांसमवेत भेट घेवून चर्चा करू व यातून मार्ग काढू असेही आ. कर्डिले म्हणाले.

नगर – मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्‍याचा काही भागात भूसंपादन केल्यानंतर आता सुरत ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गही जिल्ह्यातून जाणार असून केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सध्या सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. जिल्हा हद्दीत सुमारे 100 किमी लांबीचे काम होणार आहे. दरम्यान, या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. बागायत शेती या महामार्गासाठी जाणार असल्याने शेतकऱ्यांनी मार्गा बदलण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत केला जाणार असून जिल्ह्यात 100 किमी लांबीत होणाऱ्या या महामार्गाची रुंदी तब्बल 120 मीटर राहणार आहे. मात्र यासाठी 250 मीटर रुंदीचे भूसंपादन केले जाणार आहे. महामार्ग हा जमिनीपासून सुमारे 15 फुट उंचीवर राहणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जिल्ह्यात सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्‍यातील काही गावात सर्व्हेक्षण झाले असून मागील आठवड्यात लोणी, राहुरी विद्यापीठ, सडे, खंडाळा, वांबोरी ते नगर तालुक्‍यातील मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, शेंडी – पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, कापूरवाडी, ते वाळुंजपर्यंत सर्व्हेक्षण करण्यात येवून सिमेंटचे ब्लॉक लावण्यात आले आहे.

या महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. अनेक शेतकऱ्यांची बागायती जमीन यामध्ये जाणार आहे. काही शेतकरी तर भूमिहीन होणार असल्याचे चित्र असून त्यामुळे या महामार्गाच्या कामाला आतापासूनच शेतकऱ्यांचा विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. नगर तालुक्‍यातील मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत या कामास विरोध सुरु केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मोडीत काढण्याचे धोरण अवलंबिले आहे काय? असा सवाल मांजरसुंबा गावचे सरपंच जालिंदर कदम यांनी केला आहे. या सरकारने सध्या अस्तित्वात असलेला महामार्ग विकसित करण्याऐवजी नवीन महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरु केले आहे. फक्‍त गुजरातच्या विकासासाठी होवू घातलेल्या या महामार्गाला शेतकरी कडाडून विरोध करतील असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ.सुरेश बोरा, प्रा.देवराम शिंदे, शशिकांत गायकवाड, भीमराज आढाव, एकनाथ गुंड, अमोल लहारे, रोहिदास झिने, विलास ठाणगे, आप्पा झिने, गोरक्षनाथ झिने, राम लहारे, सुनील झिने, नितीन झिने, कचरू सोनार, अनिल कदम, कैलास कदम, अप्पासाहेब कदम, तुकाराम झिने, शिवाजी लहारे, मच्छिंद्र बोरकर, दिलीप झिने, अशोक झिने, आदिनाथ झिने, बाबासाहेब झिने आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)