सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करावा- घुले

पालकमंत्र्यांनी वजन वापरावे

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मंत्री म्हणून ओळखले जातात. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पालकमंत्र्यांनी जनतेला दिलासा देण्यासाठी आपले वजन वापरून ठोस निर्णय घेण्यासाठी शासनाला भाग पाडावे, असे घुले म्हणाले.

शेवगाव – सामान्य जनता दुष्काळात होरपळत असताना राज्य सरकारला त्याचे गांभीर्य नाही. शासन दुष्काळसदृश्‍य असा शब्द प्रयोग करीत केवळ घोषणाबाजी करण्यात दंग आहे. सरकारने निव्वळ घोषणाबाजी थांबवून प्रत्यक्ष कृती करावी व सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केली. उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक होणार आहे. त्यापार्श्‍वभूमिवर घुले यांच्या उपस्थित आज कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

घुले म्हणाले, खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम पावसाअभावी वाया गेले. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.तालुक्‍यातील चारपैकी दोन प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांना थकीत वीज बिलामुळे टाळे लागले आहे. अशा स्थितीत या योजनांचे बिल शासनाने टंचाई निधीतून भरून त्या त्वरीत सुरु कराव्यात, वीज बिल ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून परस्पर कपात केले आहे. ती रक्कम संबधित ग्रामपंचायतीच्या खात्यावर परत वर्ग करावी. आगामी काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. शेवगाव व पाथर्डी तालुक्‍यासाठी 200 च्यावर टॅंकर सुरु करावे लागणार असून त्यासाठी एकमेव शहरटाकळी या बंद पडलेल्या पाणी योजनेचा स्त्रोत उपलब्ध आहे. त्यामुळे टॅंकरने पाणी देणे, हा मोठा यक्षप्रश्‍न उपस्थित होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतकऱ्यांचे 100 टक्के कर्जमाफ करावे, बोंड अळीचे सहा कोटी रुपयांचे थकलेले अनुदान दिवाळीपूर्वी अदा करावे, जाचक अटी व निकष न लावता चारा छावण्या त्वरीत सुरु कराव्यात, तहसीलदारांना टॅंकर सुरु करण्याचे अधिकार द्यावेत, टंचाई आढावा बैठक केवळ फार्स ठरू नये, त्यात धाडसी निर्णय व त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा घुले यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)