भोयरे गांगर्डातील घरफोडीत 70 हजार रूपये लंपास

फोटो ओळ- भोयरे गांगर्डा (ता. पारनेर)- येथे रविवारी रात्री चोरट्यांनी पेटीची उचकापाचक करुन शेतात फेकून दिली.

सुपे – पारनेर तालुक्‍यातील भोयरे गांगर्डा येथे रविवारी (दि.2) रात्री 2 ते पहाटे 5 वाजेदरम्यान अज्ञात चोरांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करीत सुमारे 70 हजाराचा ऐवज घेवून पोबारा केला. याबाबत सुपे पोलिसांत अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भोयरे गांगर्डा येथील रसाळ वस्तीवर नानाभाऊ रसाळ (वय-70) हे रात्री घरात एकटेच झोपले होते, रात्री अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करून सामानाची उचकापाचक करीत पेटीतील पावने दोन तोळे सोन्याचे दागिणे, एक अंगठी, एक मिक्‍सर, एक पितळी हंडा व 9 हजार रुपये रोख असे मिळून 70 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. जातांना घरातील विविध साहित्यांनी भरलेल्या दोन पेट्या शेजारील शेतात फेकून दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दरम्यान नानाभाऊ रसाळ यांना जाग न आल्याने पुढील अनर्थ टळला. जातांना संतोष केकडे, अशोक रसाळ यांच्या घरासमोर असलेल्या जाळीतील 6 ते 7 कोंबड्याही चोरून नेल्या. घटलेला प्रकार सकाळी शेजारील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपसरपंच दौलत गांगड, सेवा सोसायटीचे संचालक आप्पासाहेब रसाळ यांना संपर्क केला. ते घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी सुपे पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

सुपे पोलीस स्टेशनचे हे. कॉ. शेरकर, वाहक भाऊ शिंदे यांनी घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास सुपे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजयकुमार सोने हे करीत आहेत. दरम्यान पंधरा दिवसापूर्वी बाबुर्डी येथे दिवटे वस्तीवर सशस्त्र दरोडा पडला होता. त्यात चोरांनी बाप लेकांना जबर मारहाण करून जखमी केले होते.

त्या घटनेचा तपास लागला नसतांनाच भोयरे गांगर्डा येथे घर फोडून 70 हजाराचा ऐवज चोरी गेला. सुपे परिसरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, या चोऱ्यांना आळा बसविण्याचे मोठे आवाहन सुपे पोलिसांसमोर आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्री गस्त घालण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)