कत्तलीसाठी चालवलेल्या जनावरांची वाहने पकडली

आठ लाखाचा मुद्देमाल जप्त ,चार जणांना केली अटक : गुजरात येथून आणली होती जनावरे

आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल

कुरणमध्ये वर्षांपूर्वी गोवंशाची कारवाई करण्यास गेलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक गोविंद ओमसे यांच्यावर हल्ला केलेल्या प्रकरणातील अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील काहीजण अटक ही होते, नंतर जामिनावर ते सर्व जण सुटून बाहेर आले. तेच आरोपी या प्रकरणात असल्याचे समजते.

संगमनेर – गुजरात राज्यातून कत्तलीच्या उद्देशाने नऊ गायी, तीन वासरांसह सहा बैल घेऊन जाणारा आयशर कंपनीचा टॅम्पो व पिकअप जीप गाडी असा सुमारे 8 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडल्याची घटना शनिवारी ( दि.1) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही वाहनाच्या चालकासह चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा जणांना अटक करण्यात आली आहे.

गुजरातहून एका आयशर कंपनीचा टॅम्पो व पिकअप जीपमध्ये कत्तलीच्या उद्देशाने जनावरे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांना शनिवारी सकाळी समजली. त्यांनी तात्काळ पोलीस हेडकॉन्स्टेबल परमेश्वर गायकवाड, पोलीस नाईक बाबासाहेब खेडकर व चालक मनोज पाटील आदींनी कऱ्हे घाटात जाऊन वाहने अडविण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने नाशिक पुणे रोडवरील कऱ्हे घाटात जाऊन सापळा लावला.

त्यानंतर मिळालेल्या वर्णनाची वाहने येताच पोलिसांनी ती अडविली. गाडीत जनावरे आहे हे कुणाला समजू नये म्हणून दोन्ही वाहने ताडपत्रीने पॅक बंद केली होती व पाठीमागून फळ्या लावल्या होत्या. पोलिसांनी त्या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता गाड्यांमध्ये निर्दयीपणे जनावरे कोंबलेली निदर्शनास आली, त्यानंतर पोलिसांनी ती दोन्ही वाहने तालुका पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर जनावरांची मोजदाद केली असता आयशर टेम्पो क्रमांक एमएच 17 एजी 5397 यात 12 जनावरे कोंबून भरलेली होती तर पिकअप क्रमांक एमएच 01 एलए 3897 यामध्ये सहा जनावरे असे एकूण 18 जनावरे आढळून आली.

दोन्ही वाहनात कोंबून आणलेली सर्व जनावरे कुरणला कत्तलीसाठी जात होती. त्यामुळे आता थेट कत्तलीसाठी गुजरातहून जनावरे कुरणमध्ये येत असल्याचे उघडकीस झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी पकडलेली सर्व जनावरे सायखिंडि फाटा येथील जिवद्याच्या पांझरपोळमध्ये नेऊन सोडण्यात आली.

याबाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक लुमा भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वाहन चालक अरुण धोंडीराम गायकवाड, जानकीराम पर्वत (दोघे रा.पिंपरी लौकी, ता.राहाता, जि.अ.नगर) अजीज अमीन शेख व आदिल रहिम शेख (दोघे रा.कुरण,ता.संगमनेर) या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलीसांनी अटक केली आहे. या चौघांना न्यालयानाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर हे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)