कालवे पूर्ण करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

रांजणगाव देशमुख – उत्तर नगर जिल्ह्यातील 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे आता जलसंपदा विभागाने तातडीने पूर्ण करावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निळवंडे कालवा कृती समितीचे नेते व शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष गंगाधर राहणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, निळवंडे कालवा कृती समितीने मोठा पाठपुरावा करून या प्रकल्पाच्या कालव्यांसाठी 158 कोटींचा निधी प्राप्त केला आहे. गत वर्षीचा 48 कोटींचा निधी शिल्लक आहे. नाबार्डकडून अजून जवळपास शंभर कोटींचा निधी मिळणार आहे व या निधीतून केवळ अकोले तालुक्‍यातील शून्य ते 28 किमी या महत्वपूर्ण टप्प्यातील कालवे व नदी नाल्यावरील पूल व तत्सम कामे प्राधान्यक्रमाने करावेत.

अकोले तालुक्‍यातील कालव्यांसाठी तीस वर्षांपूर्वी भूसंपादन करून त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या त्यागाबद्दल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना जाणीव आहे. त्यांना उर्वरित जमिनीस पाणी मिळून त्या बागायती व्हाव्यात, यासाठी त्यांच्या मागणीनुसार जलसंपदा विभागाने उच्यस्तरीय कालवे करून त्यांच्या शिल्लक क्षेत्राला पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अकोले तालुक्‍यातील सिंचनाचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला आहे. असे असताना कालव्यांना विरोध कोण व कशासाठी करीत आहे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कालवे बंदिस्त घ्या नाही तर जमिनीवरून दोन्ही प्रकारात खोदाई अपरिहार्य आहे. त्यामुळे अकोलेकरांनी कालवे होऊ द्यावेत. किरकोळ प्रश्न असतील तर कालवा कृती समिती तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे हे कालवे तातडीने करण्यात यावेत, अन्यथा समितीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पत्रकात दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)