मदतपथकातच आम्हाला आपद्प्रसंगी दिसला देव

हरिश्‍चंद्रगडावर अडकलेल्या ओंकार धोत्रे यांची प्रतिक्रिया : परिसरातील गावकऱ्यांचीही झाली मदत


 -प्रा डी के वैद्य  

अकोले – कालचा प्रसंग संस्मरणीय निश्‍चित होता. मात्र कोणत्याही प्रकारची किंचितशीही भीती मनाला स्पर्शून गेलीच नाही. मात्र आमच्या सतरा ट्रेकर्सना खाली उतरवण्यात ज्या शोध पथक व मदत पथकांनी अविरत परिश्रम घेतले, त्यांच्यामध्येच मला, माझ्या मित्रांना परमेश्‍वर दिसून आला,’ अशा प्रकारची भावनिक प्रतिक्रिया हरिश्‍चंद्रगडावरील कोकणकड्याच्या रॅपलिंग मोहिमेत अडकलेल्या ओंकार धोत्रे (पुणे) या ट्रेकरने दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

ते म्हणाले, कृपा सगळ्यांचीच, आई-वडिलांची, थोरा-मोठ्यांची आणि अज्ञात व ईश्वरी शक्तीची झाली. मात्र या संकटाने धीर खचला नाही. अजूनही ‘जितेंगे तो और भी लढेंगे’ हाच अभिनिवेश माझ्यात आणि माझ्या सर्व ट्रेकर्स बंधू व भगिनींमध्ये आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

ओंकार धोत्रे व त्यांचे सहकारी असे मिळून दोन गटांमध्ये कोकणकड्याच्या रॅपलिंगसाठी नियोजन करत होते. गडाच्या पश्‍चिमेला असणारा कोकण कडा तब्बल आठशे फूट उंचीचा आहे. या कड्यावर इंद्रधनुष्य कधीही अर्धवर्तुळाकार दिसत नाही, तर ते पूर्ण वर्तुळाकार दिसते. या कड्यावर गडावरून टाकलेली पाण्याची बाटली, फेकलेला हात रुमाल किंवा कड्यावरून खाली कोसळणारे पाणी तितक्‍याच तीव्रतेने वर फेकले जाते. या आकर्षणापोटीच हे चार महिला व 13 पुरुष, असे सतरा जण कालच्या मोहिमेत सहभागी झाले होते.

निवृत्ती नावाचा गाईड त्यांच्याबरोबर होता. पहिला टप्पा त्यांनी पूर्ण यशस्वी पार पाडला. यादरम्यान एका गटाच्या रोपचा धक्का आग्यामोहळाच्या पोळ्याला लागला आणि त्यामुळे धांदल उडाली. आजूबाजूला रातकिड्यांचा किर्र आवाज, मदतीचे दोर कापलेले आणि हौशी ट्रेकर्स म्हणून अंगाला चावणाऱ्या मधमाशा. यामुळे सर्व चित्र बदलले. बाराशे फुटांवर पोहोचलेले हे पर्यटक पुन्हा तीनशे फूट खाली आले. यादरम्यान त्यांच्याकडे संपर्कासाठी मार्ग नव्हता. मात्र त्यात ठाणे पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या महिलेने युक्तीने आपल्या मोबाईलच्याचा वापर करून 100 नंबरला कळवले आणि मग सर्वच जगाला ही घटना कळाली.

धोत्रे म्हणाले, कल्याणच्या शिवगर्जना, नाशिकच्या वैनतेय, लोणावळ्याच्या शिवदुर्ग आणि पुण्याच्या पथकांच्यामुळे संकटात सापडलेले असूनही आम्हाला या संकटाची अजिबात भीती वाटली नाही. या मोहिमेला दुसरी बाजू की, कोकण कड्याच्या पायथ्याला असणारे या गावचे लोक, या भागातील माणुसकी व मदतीची भावना यानिमित्ताने पुढे आली. शहरी मदत पथके जसे मदतीला धावले, तसे कमळू पोकळा, त्याचा भाऊ, त्याचे कुटुंब आणि इतर आदिवासी पाड्यावरची सर्वच कुटुंबे मदत करण्यासाठी पुढे सरसावलेली दिसली.

शहरी भागात आणि ग्रामीण भागात असणारा फरक तो याच ठिकाणी अधोरेखित झाला, असे सांगताना फ्लॅट संस्कृतीमध्ये शेजारी काय घडते, हे अलीकडच्याला कळत नाही. मात्र उघड्या माळरानावर नुसती किंकाळीची आर्त हाक आली तर आणि सैरभैर होतो, याची खात्री पटली.

बचेंगे तो और भी लढेंगे ही ऊर्मी मला व इतरांना शांत बसून देणार नाही, हे नक्की. भले मग यापुढे संकटांची रास कितीही पुढे उभी राहिली, तरीही मी किंवा माझे सहकारी इतरांना सांगणार ‘किनारा तुला पामराला’ आम्ही मात्र ‘द स्काय इज नो लिमिट’ हे सुवचन कवेत घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही धोत्रे म्हणाले.

कमळू पोकळा म्हणाला, आम्हाला या 17 जणांना मदत करायला खूपच बरे वाटले. घरून येताना मी आईकडून बनवलेल्या नागली व तांदळाच्या भाकऱ्या आणि बटाट्याची कोरडी चटणी हा शिधा घेऊन आलो. सोबत पाणी आणले आणि जेवढ्यांना शक्‍य आहे, त्याचे विनामोबदला वितरण केले. शेवटी देव तो माणसातच आहे, असे पाहताना समाधान भेटले, असेही तो म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)