मुंबईच्या अट्टल गुन्हेगारास शिर्डी पोलिसांनी केले जेरबंद

शिर्डी  – मुंबई शहरातील अट्टल गुन्हेगार जाफर खान याचा सिनेस्टाईलने पाठलाग करून शिर्डी पोलिसांनी एक गावठी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसासह त्यास जेरबंद केले. त्याने चोरून आणलेला टेम्पो शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई रविवारी शिर्डी पोलिसांनी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. 25) शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे व त्यांचे साथीदार पो. हे. कॉ. प्रसाद साळवे, पो. ना. बाबा सातपुते, पो. ना. किरण कुऱ्हे, पो. ना अजय अंधारे, चालक गांगुर्डे, नितीन सानप यांचे पथक गस्त घालत होते. यावेळी उपनिरीक्षक घुगे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक इसम चोरीचा टेम्पो घेऊन शिर्डीनजीक निमगाव कोऱ्हाळे ते पिंपरी निर्मळ मार्गे जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी संस्कृती लॉन्सजवळ सापळा लावला.खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पिवळ्या रंगाचा टेम्पो भरधाव वेगामध्ये समोरून आल्याचे दिसताच पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला.

मात्र चालकाने पोलिसांच्या अंगावर टेंपो घालत तेथून पळ काढला. पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करून त्यास हॉटेल गोटू का धाबा समोर अडविले. तसेच चालकास बाहेर येण्याचा इशारा केला असता, त्याने गावठी पिस्तूल पोलिसांच्या दिशेने रोखले. उपनिरीक्षक घुगे यांनी समय सूचकता दाखवत सर्व्हिस रिव्हॉल्व्हर त्याच्या दिशेने रोखले व त्याला शरण येण्याची सूचना केली.

त्यास बोलण्यात व्यस्त ठेवून इतर सहकाऱ्यांनी त्याच्यावर झडप घातली व ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पाच जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने जाफर खान (वय 42, रा. कुरेशी कंपाऊंड, बेहरामबाग, जोगेश्वरी पश्‍चिम, मुंबई) असे सांगितले. सदर टेम्पो चोरून आणल्याचेही सांगितले.

दरम्यान शिर्डी पोलिसांत त्याच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. त्याची माहिती मागितली असता, तो मुंबई शहरातील अट्टल गुन्हेगार असलायचे समजले. दरम्यान शिर्डी पोलिसांनी त्यास राहता न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मिथुन घुगे करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)