पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप

आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण ; गुन्हा दाखल करून बदलीची मागणी

कर्जत – येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे कर्जत शहरप्रमुख गणेश क्षीरसागर यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. योग्य कार्यवाही न केल्यास 26 नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक चव्हाण हे गोर गरिबांना त्रास देण्याचे काम करत आहेत. छोट्या मोठ्या व्यावसायिकांना विनाकारण चौकशीला बोलावून पैशाची मागणी करून त्रास देत आहेत. कोणी अडवण्याचा प्रयत्न केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे तालुक्‍यातील जनतेत व व्यवसायिकांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण आहे. हे अधिकारी अवैध धंद्याला स्वतःच्या स्वार्थासाठी खतपाणी घालत असुन सामान्य जनतेला त्रास देत आहेत.

त्यांनी कर्जत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून तालुक्‍यात चोऱ्यांचे व अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहेत. अवैध धंद्यांना हप्ते ठरवून संरक्षण व पाठबळ देण्यात येते. चव्हाण हे माझे जिल्ह्यातील राजकीय लोकांशी मैत्रीचे संबंध असल्याचे सांगत आहेत, असाही आक्षेप क्षीरसागर यांनी निवेदनातून घेतला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.

तक्रारीची दखल घेऊन योग्य कार्यवाही न झाल्यास शिवसेनेतर्फे 26 नोव्हेंबर ला सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संतोष भोज, दिनेश थोरात, सचिन गदादे, राजेंद्र येवले, हनुमंत आगम, तानाजी दुधे, किरण भोसले, गोरख वाघ, दीपक सराफ, कृष्णा क्षीरसागर आदींच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)