नियमनमुक्तीबाबत धमकीला भीक घालू नये : अनिल घनवट

माथाडी कामगारांच्या बंदच्या धमकीला दिले उत्तर

श्रीगोंदे  – महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या नियमनमुक्तीच्या निर्णयाविरोधात नवी मुंबई येथील व्यापारी व माथाडी कामगारांनी बंद पाळण्याची धमकी दिली आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकरी हिताचा असुन, सरकारने व्यापारी व माथाडींच्या धमकीला भीक न घालता अंमलबजावणी करावी. शेतकरी संघटना सरकारच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहील असे निवेदन, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यंनी सहकार मंत्र्यांना दिले आहे.

-Ads-

शेतकऱ्यांनी शेतमाल केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच विकावा, इतरत्र विकणे गुन्हा ठरवणारा कायदा रद्द व्हावा, यासाठी शेतकरी संघटना अनेक दशकांपासुन प्रयत्नशील होती. विद्यमान सरकारने हा क्रांतीकारी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना, काही प्रमाणात व्यापाराचे स्वातंत्र्य दिले आहे. वाशी मार्केटमध्ये होणारी शेतकऱ्यांची लूट कमी होण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे. सर्व शेती मालाची विक्री जाहीर लिलाव पद्धतीने व्हावी असा कायदा असताना वाशी मार्केटमध्ये आजही रुमालाखाली व्यवहार होतात.

आपला माल कोणाला व कसा विकला शेतकऱ्याला समजत नाही. 24 तासात मालाचे पैसे मिळावेत, असा नियम असताना अनेक महिने पैसे रखडवले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी कुठलीही सुविधा नाही, हमाल मापाड्यांची दादागिरी सोसत शेतकरी आपला माल विकतो आहे. कोणाकडे तक्रार करायची सोय नाही. नियमनाच्या कायद्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला कमी भाव मिळतो, व ग्राहकाला महाग विकत घ्यावा लागतो.

नियमनमुक्ती झाल्यामुळे शेतकरी व ग्राहक दोघांचा ही फायदा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्‍य आहे, ते आपला माल थेट ग्राहकाला विकू शकतील व ज्यांना शक्‍य नाही, ते बाजार समिती मध्ये विकणारच आहेत. कोणाचाही रोजगार बूडणार नाही. उलट व्यापाऱ्यांनी आमच्या शेतावर येऊन माल खरेदी करण्याचा व थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. व्यापाऱ्यांनी या निर्णयाकडे, व्यापार वाढवविण्याची एक संधी या दृष्टिकोणातून पहावे.

महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकरी, व्यापारी व ग्राहकांच्या सुद्धा हिताचा आहे. व्यापारी-माथाडी व हमालांच्या दबावाला बळी पडुन सरकारने हा निर्णय मागे घेऊ नये. नियमनमुक्तीच्या समर्थनार्थ शेतकरी संघटना सरकारच्या मागे खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अशा आशयाचे निवेदन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पाठविण्यात आल्याचे घनवट यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)