झिरंगे नगरमधील नागरी समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष 

अंतर्गत रस्त्यांची झाली चाळणी : डुकरांच्या उपद्रवाने नागरिक झाले त्रस्त

नगरसेवक प्रभागात फिरकले नाहीत…

सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर या भागातील नगरसेवक या ठिकाणी एकदाही फिरकले नाही. नागरिकांच्या समस्या काय आहेत. नागरिकांच्या नागरी समस्या जाणून, त्याविषयी मासिक सभेत आवाज उठवून त्याचा पाठपूरावा करून समस्या सोडविणे आवश्‍यक असताना निवडणुकीनंतर या भागातील नगरसेवक प्रभागात एकदाही फिरकले नाहीत.

श्रीरामपूर – नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील झिरंगे नगर येथे अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. मोकाट कुत्रे, डुकरांचा उपद्रव वाढला आहे. डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. सांडपाणी सोडण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. कचरा संकलन करणारी घंटागाडीही नियमित येत नाही.

नळांना पाणीही कमी दाबाने कमी वेळ येत आहे. अनेक नागरी समस्या या भागातील नागरिकांना भेडसावत असल्यामुळे पालिका प्रशासनविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या भागातील नगरसेवक व नगराध्यक्षांचेही झिरंगे नगर परिसरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

पालिका प्रशासन मालमत्ताधारकांकडून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे कर वसुल करूनही नागरिकांना नागरी सुविधा देण्यास अकार्यक्षम ठरत आहे. झिरंगे नगर भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होऊनही आजपर्यंत या भागात सांडपाणी सोडण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. या भागातील अंर्तगत रस्त्यांचीही पुरती चाळणी झाली आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. भुयारी गटार योजनेच्या कामानंतर आहे त्या रस्त्याचे मातीत रूपांतर झाले आहे. भुयारी गटार योजनेच्या कामानंतर या भागातील रस्ते पूर्ववत केले नाही. पावसाळ्यात रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल होत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात. झिरंगे नगर मधील सर्वच अंतर्गत रस्ते खराब झाले असतानाही

16 एप्रिल 2018 रोजी येथील बिल्डिकर ते सोनवणे याचे घरापर्यंत या एकाच दक्षिणोत्तर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा अनुराधा आदिक व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला होता; तब्बल 7 महिने उलटूनही या रस्त्याचे काम झाले नाही. या भागात डास प्रतिबंधक औषध फवारणी होत नसल्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे.

सांडपाणी सोडण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही

श्रीरामपूरात पुणे मुंबईच्या धर्तीवर मोठा गाजावाजा करत भुयारी गटार योजनेचे काम चालू करण्यात आले होते. 4 वर्ष होऊन गेली तरी भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्चून शहरात सुरु करण्यात आलेले भुयारी गटार योजनेचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भविष्यातही ही गटार योजना पूर्णत्वास येईल याची खात्री नाही. झिरंगे नगर मधूनच भुयारी गटार योजनेच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला होता. आजही झिरंगे नगर मध्ये नागरिकांना सांडपाणी सोडण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे अस्वच्छतेचे प्रमाणे वाढून डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)