गोदाकाठी अवैध धंद्याचा सुळसुळाट

File Photo

अवैध दारू विक्री, मटका, जुगार तसेच बिंगो व लोटोची भुरळ

-सचिन दसपुते

गोपाळपूर – नेवासे तालुक्‍यातील गोदावरी नदीकाठच्या पट्टातील सलाबतपूर, गिडेगाव, शिरसगाव, वरखेड, रामडोह, वाकडी, खामगाव, धनगरवाडी, गोपाळपूर या गावामध्ये अवैध धंदे जोरात सुरू असून हा भाग तालुक्‍यातील शेवटचा भाग येत असल्याने पोलीस प्रशासन याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

अवैधरित्या दारू, मटका, जुगार व गावागावात तरूणाईला बिंगो व लोटो गेमची भुरळ पडली आहे. यामुळे नव्याने रूजू झालेल्या पोलीस निरीक्षकांसमोर या अवैध धंद्याला आळा घालण्याचे मोठे आव्हान आहे. नेवासे पोलीस ठाण्याच्या प्रवरासंगम व कुकाणा पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रात ही गावे येतात. या पोलीस चौकीपासून ही गावे 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असल्याने या गावामध्ये पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असते.

“आमचा भाग हा बागायती असल्याने शेतीच्या सोयीसाठी लोक वस्तीवर राहतात. येथून कुकाणा पोलीस चौकी दूर असल्यामुळे काही झाले तर त्यांना येण्यासाठी वेळ लागतो.तसेच परिसरामध्ये दारू, मटका यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या सर्वासाठी शिरसगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी एक पोलीस चौकी असावी.
– भाऊसाहेब काळे सामाजिक कार्यकर्ते, वाकडी

वरखेड येथे अवैध दारू विक्रीतून एकाचा बळी गेला होता तर रामडोह येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. यानंतरही या गावांमध्ये पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे आजही सलाबतपूर, वरखेड, रामडोह, धनगरवाडी या गावामध्ये दारू विक्री खुलेआम सुरू आहे. या लोकांना कारवाईची भिती नसल्याने मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.

वाकडी, शिरसगाव, सलाबतपूर, वरखेड, रामडोहमध्ये मटका, जुगारामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून तरूण मुले मोबाईलमध्ये असलेल्या बिंगो व लोटो गेम खेळून हजारो रूपयांची उधळपट्टी करतात. या सर्व अवैध धंद्यावर नेवासा पोलीस निरीक्षक म्हणून रूजू झालेले रणजित डेरे हे काय कारवाई करतात याकड सर्वांचे लक्ष लागले आहे.

बॅकवॉटर परिसर असल्याने हा भाग बागायती म्हणून ओळखला जातो. उत्पादन जास्त असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अवैध धंद्यावर वचक बसण्यासाठी शिरसगाव हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून या ठिकाणी एक पोलीस चौकी असावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. याकडे तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधीनी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नवीन पोलीस चौकीसाठी प्रयत्न करावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)