शेवगाव – शैक्षणिक कर्जा देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या कारणास्तव येथील सेंट्रल बॅंकेच्या शाखेसमोर सुरु असलेले उपोषण तहसीलदार विनोद भामरे यांच्या उपस्थितीत व जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही बॅंकेचे कर्ज मिळत नसल्याने अशोक सगळे, बाळासाहेब लवंगे, सुनील केसभट, जालिंदर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बबन चोथे आदी पालक पाल्यांनी मंगळवारी बॅंकेसमोर उपोषण सुरू केले होते. कर्ज मंजूर होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार पालकांनी केला होता.
त्यावर आज तहसीलदार विनोद भामरे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तहसीलदार भामरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी राम केसभट, प्रकाश भोसले, राम अंधारे, राजेंद्र बनसोडे, कासम शेख, प्रमोद तांबे, सचिन घोरतळे, अनिल परदेशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा