भोजापूरच्या पाण्यासाठी कऱ्हेफाट्यावर रास्तारोको

संतप्त शेतकऱ्यांनी अर्धा तास रोखला नाशिक – पुणे महामार्ग

संगमनेर – तालुक्‍यातील दुष्काळपिडीत निमोण भागातील निमोण, पिंपळे, पळसखेडे, कऱ्हे, सोनेवाडी येथील संतप्त शेतकऱ्यांनी भोजापूर धरणातून पिण्यासाठी रोटेशन सोडावे तसेच प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रास्तारोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती.

भोजापूर पाटपाणी संघर्ष समितीचे नेते इंजि. हरिश्‍चंद्र चकोर, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत घुगे, शिवसेना तालुका उपप्रमुख संदीप सांगळे यांच्या नेतृत्वाखाली भोजापूर धरणाच्या आरक्षित पाण्याचे रोटेशन निमोण भागासाठी सोडण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या रस्तारोको आंदोलनात पांडुरंग गोमासे, मंगेश वालझाडे, मुरलीधर चकोर, भाऊपाटील कोटकर, पोपट घुगे, दत्तू ढोणे, बाळासाहेब सानप, आण्णासाहेब कोटकर, राजू भोजने, ज्ञानेश्वर घुगे, नामदेव कोटकर, एकनाथ चकोर, गणपत चकोर, गणपत घुगे, राजाराम चकोर, पुंजा ढोणे, मनोज मंडलिक, नंदू घुगे, दशरथ ढोणे, संतोष घुगे आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निमोण परिसरातील गावांमध्ये पावसाअभावी खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असताना भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्याचे रोटेशन सोडण्याची टाळाटाळ केली जात आहे. पावसाअभावी या भागातील कुपनलिका, विहिरींचे उद्भव कोरडे पडले. त्यामुळे भोजापूरचे रोटेशन त्वरित सोडण्याची तसेच दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. यावेळी इंजि. हरिश्‍चंद्र चकोर, शिवसेना तालुका उपप्रमुख संदीप सांगळे, पांडुरंग गोमासे यांनी आपल्या भाषणातून संतप्त भावना व्यक्त केल्या.

संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांनी आंदोलकांना भोजापूर पाणीप्रश्नी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. यावेळी सबंधित अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. अर्धातास रस्ता रोखून धरल्यानंतर अखेर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलन शांततेत पार पडले. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)