कुकडी चारी पाणीप्रश्नावर शेतकरी संघटित

दिवाळी फराळ कार्यक्रमाचे औचित्य : शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

कुळधरण – येसवडी कुकडी चारीच्या पाणीप्रश्नावर शेतकऱ्यांची चांगलीच चर्चा रंगली. युवक क्रांती दल आणि कुळधरण ग्रामविकास संघटनेच्यावतीने धालवडी येथील विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरासमोरील सभामंडपात बुधवारी सकाळी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात धालवडी तसेच कुळधरण येथील शेतकऱ्यांनी कुकडी आवर्तनाच्या प्रश्नावर लक्ष वेधले.

धालवडी सेवा संस्थेचे चेअरमन मोहन सुपेकर, माजी सरपंच बापूराव सुपेकर, कुळधरण ग्रामपंचायत सदस्य शेषेराव सुपेकर, बंडू सुपेकर, युवक क्रांती दलाचे सहकार्यवाह आप्पा अनारसे, राशीनचे शहराध्यक्ष किरण पोटफोडे, दादा चव्हाण, उद्धव तांबे, उत्तम खोडवे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी स्थापन केलेल्या युक्रांदच्यावतीने दरवर्षी विविध गावांमध्ये जाऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधत विविध प्रश्न समजून घेतले जातात. नव्याने सक्रिय झालेल्या तालुक्‍यातील युक्रांद टीममार्फत या प्रश्‍नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती प्रा. किरण जगताप यांनी प्रास्ताविकातून दिली.

येसवडी चारीवरील धालवडी, तळवडी, बारडगाव, येसवडी तसेच करमनवाडी या टेलच्या गावापर्यंत कुकडीचे आवर्तन नियमित पोहोचत नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. या प्रश्नावर रास्ता रोको, अधिकाऱ्यांना घेराव, कोरड्या चारीत उतरून निषेध अशा प्रकारची आंदोलने झालेली आहेत.

या पार्श्वभूमीवर दत्तात्रय पवार यांनी कुकडीच्या पाण्याचा प्रश्न यावेळी अधिकारी व पुढारी या प्रश्नाला दाद देत नसल्याने अनेक आंदोलन करावी लागत असल्याचे बैठकीत सांगितले. या प्रश्नावर असाच संघर्ष सुरू ठेवावा लागेल. बापूराव सुपेकर यांच्या पुढाकारातूनच या प्रश्नावर काम करण्याचा आग्रह त्यांनी बैठकीत धरला. उपस्थित ग्रामस्थांनी पाठिंबा देत पाण्याच्या प्रश्नावर एकजुटीने काम करण्याचे स्पष्ट केले.

युक्रांदचे सहकार्यवाह आप्पा अनारसे यांनी तालुक्‍यात अनेक प्रश्न असून या प्रश्नांवर शेतकऱ्यांनी संघटित होण्याची गरज स्पष्ट केली. कुकडी पाण्याच्या प्रश्नावर युक्रांद शेतकऱ्यांच्या सोबत आहे. ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाला युक्रांद सक्रिय पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. किरण पोटफोडे यांनी राशीन येथे केलेल्या कामाची माहिती देत शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नावर लढा देण्यासाठी सज्ज असल्याची भूमिका मांडली. दत्तात्रय चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)