नगर : भानगावात भरवस्तीत स्फोटकांचा साठा

फोटो क्रंमाक (1) भानगाव येथे भरवस्तीत उभी करण्यात आलेले स्फोटक वाहतुकीचे वाहने. (2) मानवी वापराच्या वाहनात ठेवलेले स्फोटक पदार्थ.

परप्रांतीय परवानाधारकांकडून नियमांची पायमल्ली: प्रशासनाकडून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष

-समीरण बा. नागवडे

त्यास राजकीय वरदहस्त…

भानगाव येथे परप्रांतीय व्यक्‍तीकडून भरवस्तीतून स्फोटकांचा साठा व विक्री सुरू आहे. कागदोपत्री परवाना ढोरजा येथील आहे. प्रत्यक्षात मात्र भानगाव येथून सर्व कारभार सुरू आहे. स्फोटकांचा भरवस्तीतून विक्री करणाऱ्या परप्रांतीय व्यक्‍तीला राजकीय वरदहस्त असल्याचे समजते. या परप्रांतीय व्यक्‍तीला एका राजकीय नेत्याचा आशीर्वाद असल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीगोंदा – तालुक्‍यातील भानगाव येथे भरवस्तीत स्फोटकांचा व्यवसाय सुरू आहे. परप्रांतीय परवानाधारकाकडून नियमांची पायमल्ली सुरू असून भरवस्तीत स्फोटकांचा साठा अन्‌ विक्री सुरू आहे. तालुक्‍यातील जवळपास सर्वच परवानाधारकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याची वस्तुस्थिती आहे. भरवस्तीत स्फोटकांचा साठा केला जात आहे, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

छोट्या प्रमाणावर विहिरींमध्ये सुरुंग घेण्यासाठी या स्फोटकांचा वापर करण्यात येतो. तालुक्‍यातून औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद येथे स्फोटकांचा पुरवठा होत असल्याचे प्रकरण चर्चेत आल्याने तालुक्‍यात एकच खळबळ उडाली. श्रीगोंद्यातून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे स्फोटके पुरवली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. शहरातील एका खासगी गोदामाच्या तपासणीत अमोनियम नायट्रेटचे पुरावे मिळाले होते.त्यामुळे तालुक्‍यातील स्फोटकांचे साठे अन्‌ विक्रेते संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे स्फोटके पुरवठा करणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या एक राजकीय पदाधिकारी असल्याची देखील चर्चा होती.

तालुक्‍यात स्फोटके साठा व विक्रीचे सात परवाने आहेत. मात्र या परवानाधारकांकडून त्यांना घालून देण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याची कायम ओरड होत असते. मानवी वस्ती नसणाऱ्या जागी स्फोटकांचा साठा करण्याचे सक्त निर्देश आहेत. त्याचबरोबर या स्फोटकांची वाहतूक करण्यासाठी देखील अनेक बंधने आहेत. परवानाधारक मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करताना दिसतात. स्फोटकांच्या व्यवसायात अधिकचे पैसे मिळविण्यासाठी या परवानाधारकांकडून स्फोटकांची गैरमार्गाने विक्री केली जात असल्याची देखील चर्चा सतत झडत असते.

तालुक्‍यातील भानगाव येथील एका परप्रांतीय व्यक्‍तीकडे स्फोटके साठा व विक्रीचा परवाना आहे. मात्र या परवानाधारकांकडून नियमांची पायमल्ली सुरू आहे. भरवस्तीत स्फोटकांचा साठा करण्यात आला आहे. शिवाय स्फोटकांनी भरलेली वाहने मानवी वस्तीत उभी केली जात आहेत. शिवाय याबाबत विचारणा करणाऱ्या शेजाऱ्यांना दमदाटी केली जात असल्याचे देखील समजते. स्फोटकांचा साठा व विक्री मानवी वस्तीतून सुरू असल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका संभवतो. तालुक्‍यातील स्फोटके साठा व विक्री परवाने असणाऱ्यांची तपासणी करून नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा सामान्यजन व्यक्‍त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)