दुष्काळी परिस्थितीत विद्युत पुरवठा खंडित

सीना परिसरातील शेतकरी संकटात

मांडवगण  – दुष्काळी परिस्थितीत पिण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवण्याच्या उद्देशाने धरण परिसरातील शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने, येथील शेतकरी संकटात सापडला आहे, यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्‍य्ता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापुर्वी या भागात अजिबात पाऊस न झाल्याने भयंकर परिस्थितीची निर्माण झालेली आहे. सिनाधरण परिसरात श्रीगोंदे, आष्टी, कर्जत तालुक्‍यातील हजारो हेक्‍टर उसाचे क्षेत्र आहे. फळबागेचे क्षेत्रही हजारो हेक्‍टर आहे. नव्याने हजारो हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड झालेली आहे.

धरण परिसरात वीज वितरण आणि पाटबंधारे विभागाने शेती पंपाचे विद्युत पुरवठा युद्ध पातळीवर खंडित केल्याने, वरील सर्व पिके जळून खाक होणार आहेत. शेतकरीवर्गात या निर्णयामुळे तीव्र संताप व्यक्‍त होत असून, याबाबत मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्‍यता आहे.

“विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत न झाल्यास मोठे जन आंदोलन उभे राहील.
– बाळासाहेब उगले सरपंच घोगरगाव

“धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती येथील शेतकऱ्यांची झाली आहे.
– नवनाथ डोके, सरपंच, तरडगव्हाण

दुष्काळी परिस्थितीत पाणीसाठा राखून ठेवणे योग्य असले तरी, सध्या धरणात 25 टक्के पाणी शिल्लक आहे. कुकडी लाभ क्षेत्रातील धरण पातळीतील बऱ्यापैकी धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. कुकडी निर्णयानुसार चालू अवर्तनातून भोसाखिंडीव्दारे सीना धरणात पाणी सोडणार असल्याने व अखेरपर्यंत किमान दोन आवर्तने सुटतील, अशी अपेक्षा असताना लगोलग विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्याने उसासह कांदा हाती लागेल, फळबागांचे काय व्हायचे ते होईल अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

“पाण्याचे प्रमाण कमी असून, एक महिनाभर धरण परिसरातील शेतीपंपाचा विजपुरवठा खंडीत करु नये.                    – भाऊसाहेब पठारे, सरपंच, बनपिंप्री

सध्या सर्वच साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरु असुन, युद्धपातळीवर उसतोड सुरू आहे. ऊस जळून जाण्याच्या भितीपोटी उसताडणीमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक शेतकरी आपलाच ऊस अगोदर जावा या अपेक्षेत आहे.
याबाबतीत कारखाना कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात वाद लागण्याची चिन्हे आहेत. साधारण नोव्हेंबर अखेरपर्यंत ऊसतोड आटोक्‍यात येऊ शकते. तोपर्यंत धरण परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत केल्यास जवळपास सर्वच ऊस तुटून जाईल कांद्याचे पीक हाती लागेल. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)