जोर्वेत सामूहिक मुंडण आंदोलन

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ ; खा.लोखंडेंनी दिले आंदोलनाला समर्थन

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील जोर्वे येथील प्रवरा नदीकाठावर जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ येथील शेतकऱ्यांनी आज सामुहीक मुंडण आंदोलन केले. सध्याच्या भाजप सरकारने न्यायालयाला चुकीचा अहवाल सादर केल्यामुळे तसेच 2005 साली तत्कालिन कॉंग्रेस सरकारमधील मंत्री व आमदारांनी समन्यायी पाणी वाटपाच्या ठरावावर स्वाक्षऱ्या करून आपल्या हक्काचे पाणी जायकवाडीला देण्यास मदत केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

कॉंग्रेस सत्तेत असतांना समन्यायी पाणी वाटप कायदा मंजुर केला. आज ज्या नगर जिल्ह्यातील आमदारांनी या कायद्यासाठी संमती दिली होती. तेच पाणी सोडण्यास विरोध करताना दिसतात. मात्र हा विरोध जाहीरपणे कॉंग्रेसचे नेते करतांना दिसुन येत नाही. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असतांना आज पाणी सोडले जाते. त्यामुळे समन्यायी पाणी कायदा करणाऱ्या कॉंग्रेस सरकारचा आणि न्यायालयात चुकीचे म्हणणे सादर करणाऱ्या सध्याच्या भाजप सरकारचा निषेध करतो.
– शरद थोरात, शेतकरी जोर्वे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम अजून अपूर्ण असून परिणामी अकोलेसह संगमनेर तालुक्‍यात दुष्काळी भागाला हे पाणी मिळणे अपेक्षित होते. परंतु संगमनेर तालुक्‍याला दुष्काळ जाहीर झाला असतानाही तालुक्‍यातील दुष्काळी भागाला हे पाणी मिळत नसून ते मराठवाड्याला देण्यात येत असल्याने येथील शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडन आंदोलन करून त्याचा निषेध केला आहे.

सरकार आमचे असले तरी हा चुकीचा निर्णय आहे. मी शेतकऱ्यांच्या बाजुने आहे. हा कायदा दुरुस्त केला पाहीजे, कायदा करणाऱ्या राज्यकर्त्यांमुळेच ही स्थिती आज झाली आहे. ही त्यांची चुक राज्यकर्त्यांची आहे.निळवंडे धरणाला कालवे झाले असते तर पाणी दिसले नसते, जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज पडली नसती.
-सदाशिव लोखंडे,खासदार

यावेळी खा. लोखंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले. यावेळी जोर्वे येथील शेतकरी भास्कर दिघे, शरद थोरात, संतोष रोहम, ऍड. प्रशांत वामन, दीपक वाळे, गोकुळ दिघे, शांताराम शिंदे, सचिन वर्पे यासह अनेक शेतकरी आंदोलक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)